esakal | राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, बळीराजाच्या घरात समृद्धी नांदू दे...
sakal

बोलून बातमी शोधा

Deputy Chief Minister Ajit Pawar demand to Vitthal to release Corona

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, कोरोनायोध्यांचे संरक्षण कर, बळीराजाच्या घरात समृद्धी नांदू दे, असे साकडे श्री विठ्ठलाला घातले आहे.

राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, बळीराजाच्या घरात समृद्धी नांदू दे...

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यासह जगाला कोरोनामुक्त कर, कोरोनायोध्यांचे संरक्षण कर, बळीराजाच्या घरात समृद्धी नांदू दे, असे साकडे श्री विठ्ठलाला घातले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी पंढरपुरात १० लाखांहून अधिक भाविक येतात. त्यामुळे पंढरपुरात अक्षरश: भक्तीचा महापूर आलेला असतो. परंतु यंदा कोरोना व्हायरसमुळे वारकऱ्यांना पंढरपूरला येण्यास बंदी घातली आहे. राज्यातून मानाच्या पालख्यांना एसटी बसने पंढरपुरात आणले आहे. सुमारे ८०० वर्षापासून चालत आलेल्या आषाढी वारीला यावर्षी कोरोनामुळे परिणाम झाला आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मीणीची महापूजा होत आहे. यावेळी फक्त मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश असणार आहे. देहू येथून श्री संत तुकाराम महाराज व आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्यासह मानाच्या पालख्या एसटीने पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. पंढरपुरात महिला पोलिसांनी पालख्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी लागू केली आहे. वारकऱ्यांनी यावर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरला न येता घरीच थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

दरवर्षी आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्यासह लाखो भाविका पंढरपुरात येतात.  मजल- दरमजल करत आषाढी दशमी दिवशी या सर्व पालख्या पंढरपुरात पोहोचतात. टाळ- मृदुंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष यामुळे अवघी पंढरी भक्तीरसात चिंब होत असते. जिकडे पहावे तिकडे कपाळी गंध आणि हाती भगवी पताका घेतलेले वारकरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर करत तल्लीन झालेले असतात. शहरातील विविध मठ आणि धर्मशाळा मधून कीर्तन प्रवचनात भाविक देहभान विसरून रंगून जातात. 
शेकडो वर्षाच्या या पंढरपूरच्या वारीच्या परंपरेत यंदा कोरोनामुळे विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. आषाढी यात्रेसाठी कोणीही भाविकांनी पंढरपूर येऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अनेकजण विठ्ठलाकडे राज्य कोरोनामुक्त करण्याचे साकडं घालत आहेत. असंच साकडं राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाला घातलं आहे. याबाबतचे त्यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, आषाढीएकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगचरणी केलं वंदन. राज्यासह जगाला #COVID_19 मुक्त कर, कोरोनायोद्ध्यांचे संरक्षण कर,बळीराजाच्या घरात समृद्धी नांदू दे.