महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात उपमुख्यमंत्री फडणवीस टार्गेट; 3 आहेत कारणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात उपमुख्यमंत्री फडणवीस टार्गेट; 3 आहेत कारणं

नेहा सराफ

बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. अशातच या वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टार्गेट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. (Deputy Chief Minister Devendra Fadnavis target in Maharashtra Karnataka border dispute issue )

याची कारणं ही तशीच आहेत. सीमाप्रश्न राज्याच्या निर्मितीपासून कायम आहे आणि याला कारण ठरलेत आतापर्यंतची सर्व सरकारं. त्यांनी ना सीमाप्रश्न सोडवला ना सीमाभागातल्या नागरिकांचे प्रश्न. या प्रश्नामुळे आगामी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांना आयतं कोलीत तर मिळणार यात शंका नाही. पण त्यांच्या निशाण्यावर फारसे न अडकणारे फडणवीस अडकणार आहेत.

काय आहेत कारणं?

पहिलं कारण

कर्नाटक, केंद्र आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार कर्नाटक आणि महाराष्ट्रातच नाही तर केंद्रातही भाजप सरकार असताना त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका बुचकळ्यात पाडणारी आहे. त्यातही वरिष्ठांकरवी फडणवीस सुद्धा त्यांना अजून शांत करू शकलेले नाहीत हे अधिक आश्चर्यकारक आहे. मागच्या महिन्यात गुजरातमध्ये गेलेल्या काही उद्योगानंतर आता गावे कर्नाटकमध्ये जाण्याच्या मुद्द्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाणार आहे.

Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

दुसरं कारण

त्यांना राष्ट्रीय स्तरावर असणारी प्रतिष्ठा बिहार, गोवा आणि इतरही काही राज्यात फडणवीसांनी भाजपचे प्रभारी म्हणून काम केलय. भाजपच्या कोअर टीममध्ये त्यांना स्थान आहे. असं असतानाही सीमावादासारखा आंतरराज्यीय प्रश्नावर त्यांना वेळेत तोडगा न काढता आल्याने ते निशाण्यावर असू शकतात. 

तिसरं कारण

शरद पवारांचं विधान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज एक पत्रकार परिषद घेत सरकारला ४८ तासांची मुदत दिली. तुम्ही प्रश्न सोडवला नाही तर मी बेळगावला जाईन असंही पवार त्यात म्हणाले आणि साहजिकच फडणवीसांवर आणि शिंदेंवर दबाव आला आहे. 

काही वेळेपूर्वीच फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत गृहमंत्री शहांशी बोलणार असल्याचे सांगितले. मागच्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाचे मंत्री विविध वक्तव्यांमुळे अधिक टार्गेट होत आहेत.

त्यातच आता भाजपचे आणि सरकारचे सुद्धा प्रमुख असलेल्या फडणवीसांना कोंडीत पकडण्याची संधी महाविकास आघाडी सोडेल असं वाटत नाही. त्यामुळे सीमावादावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे यात शंका नाही.