
लज्जास्पद! इंधन दरकपातीवरून फडणवीसांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका
मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट (VAT on Petrol Diesel) कमी केल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पण, अद्याप कुठलाही अध्यादेश काढलेला नाही. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने जनतेला मे महिन्यात 'एप्रिल फूल' केले असून ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे, असं फडणवीस म्हणाले.
हेही वाचा: Petrol-Diesel Price: खुशखबर! पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर
फडणवीस काय म्हणाले? -
महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली हे लज्जास्पद आहे. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही, तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलवर 2.08 रुपये आणि डिझेलवर 1.44 रुपये जे कमी झाले, तो रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेस केंद्र सरकारने कमी केल्याने राज्याचा कर कमी झाला आहे. स्वत: काहीच करायचे नाही आणि केंद्राने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचे सुद्धा श्रेय घ्यायचे, हे फारच गंभीर आहे, अशी जोरदार टीका फडणवीसांनी केली आहे.
कर कमी करण्याची मागणी -
महाविकास आघाडी सरकारने लोकांना मुर्ख न बनविता तत्काळ पेट्रोल-डिझेल दरकपातीचा निर्णय घ्यावा, ही माझी पुन्हा मागणी आहे. ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेल दर कपातीबाबत काल केलेली घोषणा पाहून ‘उंटाच्या तोंडात जिरे’ असे मी म्हटले होते. पण, प्रत्यक्षात तर हा संपूर्ण प्रकार मे महिन्यात ‘एप्रिल फूल’ करणारा ठरला, असं फडणवीस म्हणाले.
DGIPR वरून काय माहिती शेअर केली? -
केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यानंतर राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रति लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे, असं ट्विट डीजीआयपीआरने केलं आहे.
Web Title: Devendra Fadnavis Attack On Thackeray Government Over Petrol Diesel Rate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..