Gujarat Election: गुजरातमध्ये देवेंद्र फडणवीसांचा करिष्मा दिसेल का?; बिहार, गोव्यात दिसली होती चुणूक

Gujarat Election
Gujarat Electionesakal

Gujarat Assembly Election 2022: देशपातळीवरील राजकारणात भविष्य असलेला नेता, अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. त्यांनी आपल्यातील गुणांची चुणूक बिहार आणि गोवा विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलेली. आता गुजरात निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचे कोणते गुण कामी येतात, हे पाहाणे औत्सुक्याचं आहे. गुजरातमध्ये ते भाजपचे स्टार प्रचारक आहेत.

राजकारणात चढ-उतार असतात. त्यातून प्रत्येकाला जावं लागतं. देवेंद्र फडणवीसांचा आजवरचा आलेख पाहिला तर ते चढत्या क्रमाने वर गेलेले आहेत. नुकत्याच झालेल्या सत्तासंघर्षाचा अपवाद मात्र वगळावा लागेल. सध्या गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक आहेत. तसेच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मंडाविया, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींसह ४० नेते स्टार प्रचारक आहेत.

१ आणि ५ डिसेंबरला गुजरात निवडणूक पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्यात ८९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. एकूण १८२ जागांवर निवडणूक होणार आहे.

२०१७मध्ये अशी झाली लढत

गुजरातेतल्या विधानसभेच्या १८२ जागांमध्ये बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७मध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ७७ जागांवर. ६ जागांवर अपक्षांनी बाजी मारलेली.

कुठल्या विभागात किती मतदारसंघ?

मध्य गुजरातमध्ये ६८ जागा आहेत. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

२०१४ आणि त्यापूर्वीची परिस्थिती

2014 पूर्वी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यापूर्वी महाराष्ट्रात भाजपच्या ४५ जागा होत्या. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाने भाजपने थेट 122 जागांपर्यंत मजल मारली. अर्थात मोदी लाटेचा काहीसा परिणाम होताच. तिथून पुढे झालेल्या राज्यातील इतर निवडणुकांमध्ये भाजपने भरघोस यश मिळवलं. २०१४मध्ये शिवसेनेचे ६३ उमेदवार विजयी झाले होते. दुसरीकडे आघाडीतील काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ उमेदवार विजयी झालेले.

यापूर्वी २००९मध्ये अगदी उलट स्थिती होती. काँग्रेसचे ८२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६२, भाजपचे ४६, शिवसेनेचे ४४ उमेदवार विजयी झालेले. नाही म्हटलं तरी २०१४मध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. कारण विधानसभा निवडणुकीपर्यंत मोदी लाट काही प्रमाणात ओसरली होती.

फडणवीसांनी बिहारमध्ये नेमकं काय केलं?

२०२० मध्ये बिहार विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे प्रभारी होते. त्यापूर्वीची परिस्थिती काय होती, ते पाहू. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा आहे. २०१५मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आरजेडीने (राष्ट्रीय जनता दल) ८० जागा जिंकल्या. जनता दल युनायटेडने ७१ जागांवर वर्चस्व सिद्ध केलेलं. त्याखालोखाल काँग्रेसने २७ जागा जिंकल्या. भाजपने ५३ जागांवर विजय मिळवला. लोक जनशक्ती पार्टी-२, राष्ट्रीय लोक समता पार्टी-२, हिंदुस्थानी आवाम मोर्चा-१, सीपीआय-३, अपक्ष ४; अशी पक्षीय बलाबल होती.

त्यानंतर २०२०मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भाजपने मोठे यश पदरात पाडून घेतले. बिहारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. यावेळी भाजपने ७४ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर जनता दल (युनायटेड)- ४३, आरजेडी ७५, काँग्रेस- १९, सीपीआय एल.-१२, व्हीआयपी-४, एजएएम-४, सीपीआय-२, सीपीआय एम.-२, एसआयएम-५, बीएसपी-१, लोक जनशक्ती-१, अपक्ष १.

बिहारमध्ये देवेंद्र फडणवीसांचा करिष्मा कामी आला. जिथे जेडीयू सर्वात प्रबळ, आरजेडी सक्षम विरोधी पक्ष आणि काँग्रेसही ताकदीचा होता. तिथे फडणवीस यांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष करुन दाखवलं. तरीही भाजपने नितीशकुमारांना मुख्यमंत्रीपदी बसवलं. त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे.

देवेंद्रांमुळे गोव्यातही चित्र बदललं

गोव्यामध्ये २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ४० पैकी भाजपने १३ जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसने १७. गोमन्तक पक्षाने ३, गोवा फॉरवर्ड पार्टीने ३, राष्ट्रवादीने १ तर ३ जागांवर अपक्ष विजयी झाले होते.

२०२२मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने २० जागा जिंकल्या. त्याखालोखाल काँग्रेस - ११, गोवा फॉरवर्ड पार्टी-१, आप- २, मगोप- २, आरजीपी-१ आणि अपक्ष ३ जागांवर विजयी झाले. गोव्यात निर्विवाद भाजपची सत्ता आहे.

याचं यश देवेंद्र फडणवीस यांच्या पारड्यात जातं. त्यांच्यावर भलेही फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप होत असेल पण असं करुन पक्षाला मोठं करणारे ते एकटे नाहीत. त्यामुळे ते आता गुजरातमध्ये पक्षासाठी कसे उपयोगी ठरणार, हे कळेलच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com