esakal | विधानसभेवर भाजपाचाच झेंडाच; मुख्यमंत्र्यांनी टाळला शिवसेनेचा नामोल्लेख
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

राज्य शासनाने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचवून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी  फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी (ता. ३१) येथे आली. रात्री पावसात त्यांची जाहिर सभा झाली. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

विधानसभेवर भाजपाचाच झेंडाच; मुख्यमंत्र्यांनी टाळला शिवसेनेचा नामोल्लेख

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : महाजनादेश यात्रेनिमित्त येथे झालेल्या जाहिर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच नामोल्लेख टाळला. त्यांनी आपल्या भाषणात एकदाही शिवसेना किंवा युतीचे सरकार याचाही उल्लेख केला नाही. उलट भाषणाच्या शेवटी विधानसभेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकवणार अशी घोषणा केली. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती लढणार की स्वतंत्र लढणार या चर्चेला उधाण आले आहे.

राज्य शासनाने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचवून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी  फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी (ता. ३१) येथे आली. रात्री पावसात त्यांची जाहिर सभा झाली. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सुरु असलेली वाटचाल याचीही माहिती त्यांनी दिली. अर्धातास त्यांनी भाषण केले. यात त्यांनी एकदाही शिवसेनेचा नामोल्लेख केला नाही, किंवा युतीचे सरकार असेही म्हटले नाही. उलट भाषणाच्या शेवटी लातूरकरांचा जनादेश मोदींना आहे का?, मला आहे का?, पालकमंत्री निलंगेकरांना आहे का?, महापौरांना आहे का? असे प्रश्न उपस्थितांना विचारून होकार घेतला. तसेच तुमच्या जनादेशावर आता मुंबईला जावून विधानसभेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लावतो अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. युतीचा झेंडा फडकविला जाईल असेही ते म्हणाले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा नामोल्लेख टाळल्याने आता चर्चेला उधाण आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत युती होणार की नाही याकडे आता लक्ष लागले आहे.

राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मुस्लिम समाजालाही आरक्षण द्यावे या करीता हा समाज आक्रमक आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक स्पष्टीकरण देत हा विषय मागे टाकल्याचे दिसून आले. केंद्र शासनाच्या आर्थिक दृष्ट्या मागास यातूनच आता मुस्लिम समाजाने आरक्षण घ्यावे असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मुस्लिम समाजाचे देखील आरक्षण कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. अशाच एका प्रश्नावर श्री. फडणवीस यांनी एक स्पष्टीकरण दिले. केंद्र शासनाने आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठी दहा टक्के आरक्षण दिले आहे. यात मुस्लिम समाजही येतो. हे मी विधानसभेत उदाहरणासह सांगितले आहे. आयआयटीसाठी ज्यांचा क्रमांक दोन हजारावर होता तो या आरक्षणामुळे २०० च्या मध्ये आला व त्यांचा आयआयटीला नंबर लागला. त्यामुळे या आरक्षणाचा लाभ मुस्लिम समाजाला मिळत आहे, असे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांचे हे स्पष्टीकरण म्हणजे राज्य शासनाने आता मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय मागे टाकल्यातच जमा आहे, असेच होते.

loading image
go to top