फडणवीसांकडे पुणे-सोलापूरची जबाबदारी? शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील नॉट रिचेबल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis
फडणवीसांकडे पुणे-सोलापूरची जबाबदारी? शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील नॉट रिचेबल

फडणवीसांकडे पुणे-सोलापूरची जबाबदारी? शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील नॉट रिचेबल

सोलापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजयासाठी भाजप व शिंदे गटाला महाविकास आघाडीविरूध्द लढावे लागणार आहे. शिवसेनेतील ४० आमदारांवरील बंडखोर, गद्दारीचा शिक्का पुसण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचेच पालकमंत्री असतील. सोलापूर व पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षातील अनेक नेतेमंडळी, विद्यमान आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांचे पक्षांतर फडवणीस यांच्या माध्मातूनच होऊ शकते. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी ते घेऊ शकतात.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ३९ दिवसांनी झाला. त्यात भाजप व शिंदे गटाचे प्रत्येकी नऊ मंत्री आहेत. बंडखोर १६ आमदारांचे निलंबन प्रकरण व चिन्हाचा वाद मिटल्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होईल. दुसऱ्या टप्प्यात कोणाकोणाला मंत्रिपदे द्यायची, याचा तिढा अजून सुटलेला दिसत नाही. सोलापूर जिल्ह्याला भाजपने २०१४ च्या निवडणुकीनंतर दोन मंत्रिपदे दिली आणि जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार व दोन्ही खासदार निवडून आले. पण, पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला संधी मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण, हा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यात शिवसेनेची ताकद मोठी असल्याने शिंदे गटाला औरंगाबाद, उस्मानाबाद, यवतमाळ, जळगाव, जालना व बुलढाणा या मतदारसंघात पालकमंत्रीपद मिळतील, अशी चर्चा आहे. दुसरीकडे उर्वरित अडीच वर्षांत मतदारसंघात जम बसवून पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून शिंदे गटासह भाजप व अपक्ष आमदारांना मतदारसंघातील विकासकामांसाठी विविध योजनांमधून प्रत्येकी किमान चारशे कोटींचा निधी दिला जाईल, असेही बोलले जात आहे. मंत्रिपदे न मिळालेल्यांची नाराजी तशाप्रकारे दूर करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार करेल, अशी चर्चा आहे.

शहाजी पाटलांनाही व्हायचंय मंत्री
सांगोला मतदारसंघातून दोनदा आमदार झालेले शहाजी पाटील सध्या शिवसेनेशी बंडखोरी करून शिंदे गटासोबत गेले आहेत. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं ओक्केमधी हाय’ म्हणत देशभर पोहचेले शहाजी पाटील यांनाही किमान राज्यमंत्रिपद तरी मिळावे, अशी आशा आहे. भाजप-शिंदे गटाच्या सरकारमध्ये आपली मंत्रिपदी वर्णी लागेल म्हणून त्यांनी थेट गुहावटी गाठली. पण, पहिल्या टप्प्यात त्यांना संधी न मिळाल्याने मंगळवारी (ता. ९) दिवसभर त्यांचा फोन नॉट रिचेबल होता.

पहिल्यांदा आमदार झालेल्यांना संधी कमीच
जिल्ह्यातील माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, पंढरपूर-मंगळवेढा व बार्शी याठिकाणी भाजपचे आमदार आहेत. त्यातील दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख व बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत हे त्या मतदारसंघातून अनेकदा निवडून आले आहेत. दुसरीकडे अकलुजचे रणजितसिंह मोहिते-पाटील हे पहिल्यांदाच भाजपकडून विधानपरिषदेवर गेले आहेत. त्यामुळे पहिल्यांदा निवडून आलेल्यांना संधी देण्याऐवजी भाजपकडून जुन्यांनाच अडीच वर्षे मंत्रिपदी संधी मिळू शकते.

स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन कोणाच्या हस्ते?
दरवर्षी पंरपरेनुसार त्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करतात. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव घरोघरी साजरा केला जात असतानाच आता १५ ऑगस्टला झेंडावंदन कोणाच्या हस्ते होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वातंत्र्यदिनाला आता केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. तरीपण, शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्री निवडलेले नाहीत.