विधान परिषदेत सतेज पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम’करणार ; धनंजय महाडिकांचा दावा :Vidhan Parishad Election 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satej PAtil, Dhanjay Mahadik

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नावाची चिठ्ठी देऊनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला गोकूळ दूध संघामध्ये संचालक होता आले नाही.

विधान परिषदेत सतेज पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम’ करणार

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री आणि महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार सतेज पाटील (Satej Patil) यांनी गेल्या सहा वर्षात सर्वांच्याच कळा काढल्या आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते त्यांच्यावर चिडून आहेत. आत्ता जरी ते त्यांच्या व्यासपीठावर दिसत असले तरी हेच नेते विधान परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार आहेत, असा दावा माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी (ता. २२ नोव्हेंबर) कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सतेज पाटील यांच्या पराभवाचे भाकीत केले आहे. महाडिक म्हणाले की, महाविकास आघाडीतील शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांना सत्तेत असूनही पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून हवे तसे पाठबळ मिळालेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नावाची चिठ्ठी देऊनही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला गोकूळ दूध संघामध्ये संचालक होता आले नाही. ही नाराजी मतातून स्पष्टपणे दिसेल.

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक १०५ लोकप्रतिनिधी मतदार आहेत. आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे गट मिळून आमची मतदारसंख्या १५५ पर्यंत जाते. आमच्या विरोधातील उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांच्या पक्षाचे केवळ ३६ मतदार आहेत.

महाविकास आघाडी मिळून ही संख्या ११८ पर्यंत जाते. त्यांना विजयासाठी ९० ते १०० मते लागतात. तर आम्हाला विजयासाठी ४० ते ४५ मते हवी आहेत. त्यात पालकमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या सहा वर्षांत सर्वांच्याच कळा काढल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते त्यांच्यावर चिडून आहेत. त्यातील बहुतांशी मंडळी आत्ता जरी त्यांच्या व्यासपीठावर दिसत असले तरी हेच नेते विधान परिषदेच्या निवडणुकीत पालकमंत्र्यांचा ‘कार्यक्रम’ करणार आहेत, असा दावा धनंजय महाडिक यांनी केला.

हेही वाचा: अफगाणवर संकट ; परराष्ट्र मंत्र्यांनी मालमत्ता मुक्तीची अमेरिकेकडे केली मागणी

दरम्यान, भाजपचे उमेदवार अमल महाडिक हे मोठ्या फरकाने निवडून येतील, असा विश्वासही माजी खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. पालकमंत्री पाटील यांनी २७० मतदारांचा आकडा जाहीर केला आहे. त्याबाबत महाडिक म्हणाले की, ‘पक्षनिहाय मतांची संख्या कागदावर आहे. तरी देखील पालकमंत्री कोणता आकडा सांगतात, हे त्यांनाच माहिती. आम्हाला त्यांच्यासारखे बंगालीबाबाप्रमाणे भविष्य सांगता येत नाही. आम्ही जनतेत काम करणारी माणसे आहोत. जनतेच्या पाठबळावरच निवडणूक लढवतो.’

loading image
go to top