पालकमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ; धनंजय महाडिक यांचा आरोप, आता न्यायालयात दाद मागणार : Dhananjay Mahadik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Mahadik

पालकमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ; धनंजय महाडिक यांचा आरोप

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांनी आपल्या विधान परिषदेच्या उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या शपथपत्रामध्ये स्थावर मालमत्तेची आणि कर्जाची माहिती लपवली आहे. त्यांनी महापालिकेचा घरफाळाही थकवला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे हे चुकीचे आहे. त्यामुळे सतेज पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध आहे. असा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik)यांनी आज पत्रकार परिषदेत केला. याबाबत आम्ही न्यायालयात जाणार असून निवडणूक आयोगाकडेही याची तक्रार करणार असल्याचे महाडिक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी धनंजय महाडिक म्हणाले, ‘विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरताना आपले उत्पन्न, मालमत्ता, कर्ज, शासकीय देयकाची थकित रक्कम याची खरी माहिती शपथपत्रावर द्यायची असते. मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी शपथपत्रातच अपुर्ण माहिती दिली आहे.

याबाबत भाजप उमेदवार अमल महाडिक यांनी हरकत घेतली. त्याबाबतचे पुरावेही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार कसबा बावडा येथील सर्व्हे नं.५४८/२/१४ क्षेत्र ०.०५ आर. या मिळकतीची माहिती त्यांनी लपवली आहे. तसेच कावळा नाका (ताराराणी चौक) येथील सिटी सर्व्हे नं. २१०४/१५ या मिळकतीतील क्षेत्र व त्यातील सतेज पाटील यांचा हिस्सा याबाबत खोटी माहिती दिली आहे. या ठिकाणी सयाजी हॉटेल व डि.वाय.पी सिटी मॉल हे व्यावसायिक इमारत आहे. या शिवाय कॉसमॉस को.ऑप.बँक येथून घेतलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कर्जाचा उल्लेखही शपथपत्रात नाही.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वीच धनंजय महाडीकांकडून पराभव मान्य ; सतेज पाटील

कावळा नाका येथील मिळकतीचा घरफाळा न भरल्याने त्यांना महाराष्ट्र महापालिका कायदा अंतर्गत १५ (२) प्रमाणे नोटीस बजावली आहे. त्याचा व थकीत रक्कमेचा उल्लेखही शपथपत्रात नाही. त्यांनी सीटी.सर्व्हे नं.२१०४/१५ या मिळकतीची वाटणी आपापसात केली असून ती शंभर रुपयांच्या स्टँपवर केल्याचे निदर्शनास आले. याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी त्यांना बुडवण्यात आलेल्या मुद्रांक वसुलीबाबत नोटीसही पाठली आहे. त्याचा आणि देय रक्कमेचा उल्लेख शपथपत्रात नाही. या सर्व बाबी जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासह हरकतीच्या माध्यमातून निरदर्शनास आणून दिल्या. मात्र कायद्याने निर्णय देण्यास असमर्थ असल्याने न्यायालयात न्याय मागणे योग्य होईल असे सांगून कार्यवाही पूर्ण केली. त्यामुळे आम्ही या विरोधात गुरुवारी (ता.२५) उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.’ असे धनंजय महाडिक म्हणाले.या पत्रकार परिषदेला माजी महापौर सुनिल पाटील, माजी नगरसेवक प्रा.जयंत पाटील, सत्यजीत कदम, पृथ्वीराज महाडिक हे उपस्थित होते.

loading image
go to top