निवडणुकीपूर्वीच महाडीकांकडून पराभव मान्य करत माझ्या विजयाची कबुली; सतेज पाटील : Satej Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhanjay mahadik,satej patil

लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आणखी एका पराभवाच्या या नैराश्यामुळेच महाडिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

निवडणुकीपूर्वीच धनंजय महाडीकांकडून पराभव मान्य ; सतेज पाटील

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये (Vidhan Parishad Election 2021) महाडिकांचा पराभव होणार या भीतीपोटीच माजी खासदार धनंजय महाडिक (Dhanjay Mahadik)यांनी आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांबाबत योग्य ती कागदपत्रे उमेदवारी अर्जासोबत आम्ही जोडलेली आहेत. मैदानात लढण्यापेक्षा कायद्याची भाषा बोलून मैदानातून पळ काढण्याचा हा प्रकार आहे. सतेज पाटील (Satej Patil)जिंकले तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे म्हणून महाडिकांनी निवडणुकीपूर्वीच आपला पराभव मान्य केला आहे, असा पलटवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केला.

पत्रकात पुढे म्हंटले आहे की, या निवडणुकीत, महाविकास आघाडीतील सर्व पक्षाचे नेते माझ्या विजयासाठी अथक परिश्रम करत आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला प्रत्येक ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त पाठींबा मिळत आहे. याउलट, महाडिक पाठिंब्यासाठी ज्या ज्या ठिकाणी जातात, त्या त्या ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. ज्या प्रमुख गटांच्या जीवावर ते निवडणूक लढवत होते, त्या गटांनी मला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे, त्यांना नैराश्य आले आहे. माझ्या विजयाची महाडिकांनाच खात्री झाल्यानेच ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत. याचा अर्थ निवडणुकीच्या १५ दिवसांअगोदर महाडिकांनी आपला पराभव मान्य केला आहे. ज्यावेळी निवडणुकीत आपला पराभव दिसतो, त्यावेळी निवडणुकीतील मूळ मुद्दे बाजूला ठेऊन बाकीचे विषय उपस्थित केले जातात, आणि महाडिक तेच करत आहेत.

हेही वाचा: 100 कोटीची आॅफर नाकारली पण, पक्ष सोडला नाही म्हणणारे दगडफेक करतायेतं...

कोणत्याही निवडणुकीत समोरचा माणूस कोणती शस्त्रे घेऊन लढाई करत आहे, हे पाहून त्या प्रकारची लढाई करायची असते. पण, महाडिक मात्र हे सगळं विसरून कागदपत्रे शोधण्यात वेळ घालवून रडीचा डाव खेळत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यावर महाडिक हे माझ्याविरुद्ध कागदपत्रे गोळा करण्यात व्यस्त होते. या उलट मी मात्र जिल्ह्यातील भाजपसह सर्व पक्ष आणि स्थानिक आघाड्यातील मतदारांच्या भेटी घेतल्या. या निवडणुकीत हे मतदारच महत्वाचे आहेत. महाडिकांची अशा प्रकारची कागदपत्रे या निवडणुकीत कामाला येणार नाहीत. आपल्याकडे विजयाएवढी मते आहेत असे दावे सतत करणाऱ्या महाडिकांनी आपल्या पत्रकार परिषदेत माझ्या विजयाची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे.

भाजपच्या बैठकीवेळी, आ. प्रकाश आवाडे यांनी राहुल आवाडे यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती, असा विषय उपस्थित करताच माजी आमदार महाडिक यांनी आम्ही माघार घेतो, तुम्ही निवडणूक लढवा, असे म्हणत हात जोडले होते. हे पाहता, निवडणूक लढविण्यापूर्वी मानसिकरीत्या महाडिकांनी पराभव मान्य केला आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आणखी एका पराभवाच्या या नैराश्यामुळेच महाडिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच, यापूर्वी बोललेले मुद्दे घेऊन महाडिक आरोप करत आहेत. महाडिकांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आम्ही सुद्धा कोणत्याही कायदेशीर लढाईला तयार आहोत.

ही लढाई कोल्हापूरची स्वाभिमानी जनता विरुद्ध महाडिक

विधानपरिषदेच्या निवडणुकीतील मतदार हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व करायची संधी दिली आहे. या मतदारांची महाडिकांनी निवडणुकीपूर्वी किती आणि कोणत्या प्रकारची कामे केली? त्यांना कोणत्या प्रकारची मदत केली? याचा सुद्धा महाडिकांनी हिशोब द्यावा. आता ही लढाई सुद्धा कोल्हापुराची स्वाभिमानी जनता विरुद्ध महाडिक अशीच आहे.

मतदारच महाडिकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतील

गेल्या २५ वर्षांत महाडिकांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी केली आहे. दादागिरी आणि भीती दाखवून अनेकांना गप्प केले आहे. त्यामुळे, या निवडणुकीत हे सर्वजण महाडिकांचा करेक्ट कार्यक्रम नक्कीच करतील. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणुकीतही पराभवाचा तिसरा अंक महाडिकांना पाहायला लावतील.

loading image
go to top