
'राज्यातील शांतता व सलोखा बिघडवण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करताहेत'
विरोधकांच्या राजकारणामुळे ED ला, 'बिडी'ची किंमत राहिली नाही
सध्या राज्याचे सामाजिक सौख्य बिघडले आहे. राज्यात अशांतता (Law & Order) निर्माण करण्याचा अनेकांचा प्रयत्न सुरू आहे. 'ईडीनंतर आता (ED) यांना भोंग्याचा मुद्दा (Loudspeaker) आठवला आहे. विरोधकांच्या या राजकारणामुळे याच ‘ईडी’ला आता साध्या 'बिडी'चीही किंमत उरलेली नाही, असे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी केले.
यावेळी मंत्री मुंडे यांनी केंद्र सरकार व वाढत्या महागाईचा चौफेर समाचार घेतला. ते म्हणाले, राज्यातील शांतता व सलोखा बिघडवण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करत आहेत. जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनवण्यासाठी सर्वांनी पुन्हा एकदा एकजूटीन काम करायला हवं. तुमची कामे करण्यासाठी आम्ही मुंबईला बसलो आहोत. आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून केवळ अमळनेर मतदारसंघातच नाही तर जळगाव जिल्ह्यात विकासाच्या विविध योजना आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे राजकीय ओबीसी आरक्षणापासून वंचित राहावं लागत असल्याचा हल्लाबोल खडसे यांनी केला. ओबीसी समाज एकत्र आला नाही तर यापुढे शैक्षणिक आरक्षणालाही मुकावे लागेल की काय अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले, पारोळा तालुक्यात मात्र अमळनेर मतदारसंघात येणाऱ्या ४२ गावांचा माझ्या आमदारकीच्या विजयात सिंहाचा वाटा आहे. या गावांमध्ये विकासकामांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बियाणाच्या प्रश्नाला त्यांनी हात घातला. बियाणे विक्री लवकरात लवकर करावी, जेणेकरून बियाणांचा काळा बाजार होणार नाही व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, याची काळजी सरकारने घ्यावी असे आवाहन आमदार पाटील यांनी केलं आहे.