राज्यात हुकूमशाही चालणार नाही; अजित पवार यांचा राज ठाकरे यांना इशारा

तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या, असा सज्जड दमच अजित पवारांनी भरला आहे.
Raj Thackeray Ajit Pawar
Raj Thackeray Ajit Pawar
Summary

भाजपला मनसेची गरज नाही - रामदास आठवले

मुंबई : महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य असून संविधानावर आधारित सरकार आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारला निर्वाणीचा इशारा (अल्टिमेटम) कुणी द्यायचा नाही. अशी हुकूमशाही चालणार नाही. तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतःच्या घरात द्या. कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

‘‘अल्टिमेटमची भाषा कुणी करू नये. हे सरकार कायद्याने चालते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी योग्य त्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. अशा पद्धतीने वक्तव्य करणे योग्य नाही. जो काही निर्णय होणार असेल तर तो सर्वांना बंधनकारक आहे. वेगवेगळ्या धर्मांना नियम लागू होईल, असे पवार यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये जे घडले त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये निर्णय दिला होता. त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात जी धार्मिक स्थळे आहेत त्यांनी परवानगी घ्यावीच. तसेच आवाजाची मर्यादा ओलांडू नये असे सांगतानाच परवानगी घेतली नसेल तर ठराविक दिवसात ती घ्यावी. नाही घेतली तर कठोर भूमिका घेतली जाईल. कायदा कुणी हातात घेण्याचा व तसे धाडस कुणी करू नये, असा इशारा पवार यांनी दिला.

‘भाजपला मनसेची गरज नाही’

सोलापूर : ‘‘दोन समाजात तेढ निर्माण करणारी राज ठाकरे यांची भूमिका चुकीचे आहे. त्यांच्या झेंड्यात पूर्वी सर्व रंग होते. आज त्यांनी केवळ भगवा रंग ठेवला आहे. भगवा रंग हा वाद लावणारा रंग नाही, तो शांततेचे प्रतीक आहे. भाजपला मनसेची गरज नाही,’’ असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ज्येष्ठ संशोधक चंद्रकांत पांडव यांच्या सत्काराच्या निमित्ताने आठवले सोलापूर येथे गुरुवारी आले होते. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध नाही मात्र ती मंदिरात म्हटली पाहिजे. सामंज्यस्यातून भोंगे काढता येतील पोलिसांनी बळजबरीने ते काढू नये. सर्वच धर्मात पंरपरा आहेत. भीमजयंतीचे कार्यक्रम, मिरवणुका रात्री उशिरापर्यंत होतात. केवळ विशिष्ट धर्माच्याच भोंग्यांवर कारवाई करता येणार नाही. राज ठाकरे यांनी वाद निर्माण करू नयेत. त्यांनी असे वाद निर्माण केले तरी भाजप मनसेला बरोबर घेणार नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

मुंबईत पहाटेची अजान भोंग्यावर नाही

मुंबई : दक्षिण मुंबईतील २६ मशिदींनी मुंबईतील अनेक भागांत पहाटेची अजान ध्वनीवर्धकावर न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे मशिदींच्या ट्रस्ट आणि मौलवींनी सांगितले.

राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यांवर वाजवण्यात येणाऱ्या अजानच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारला ३ मे पर्यंतची अंतिम मुदत दिली होती. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गृह विभागाने एकीकडे चोख बंदोबस्त ठेवलेला असतानाच सुन्नी बडी मशिदीत काल रात्री उशिरा झालेल्या मौलाना आणि ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार आज दक्षिण मुंबईत भोंग्यावर अजान झाली नाही. त्यानंतर दिवसभरातील अजानसाठी मात्र भोंगे वापरण्यात आले.

राज यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा

मुंबई : मशिदी आणि मंदिरांवरील भोंग्यांवरून राजकारण सुरू असताना आता चिथावणीखोर भाषण केल्याच्या आरोपात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्याच्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका केली आहे. शुक्रवारी (ता. ६) खंडपीठापुढे याचिकेचा उल्लेख करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com