
राज ठाकरेंना औरंगाबादची सभा महागात? कारवाईबाबत गृहमंत्री म्हणतात...
मुंबई : पोलिसांनी काही अटी घालून राज ठाकरेंच्या सभेला (Aurangabad Raj Thackeray Sabha) परवानगी दिली होती. त्यानंतर आता राज्याचं गृहखातं अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. कायदेशीर मत घेऊन राज ठाकरेंविरोधात कारवाई केली जाईल. याबाबत उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले.
हेही वाचा: सभेत काय काय घडलं? कोणत्या मुद्द्यांवर व्यक्त झाले राज ठाकरे? जाणून घ्या
राज ठाकरेंनी फक्त शरद पवारांवर टीका केली. तसेच भोंग्यावरून समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य केलं. औरंगाबादचे पोलिस आयुक्त राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास करत आहेत. त्यानंतर कायदेशीर मत घेऊन काय कारवाई करायची हे ठरवले जाईल. कुठल्याही घटना घडू नये यासाठी आम्ही तयारीत आहोत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या मुंबईला बैठक बोलावली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन कोणीही करून चालणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सक्षम आहे, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत पोलिसांची परवानगी घेऊन भोंगे लावावे, असं देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. राज ठाकरे काही सर्वोच्च न्यायालयाच्या वरचे नाहीत. ते न्यायालयाचा आदेश डावलू शकत नाहीत. वाद पुन्हा न्यायालयात पोहोचला तर रात्रीचे किर्तन, पहाटे पाच वाजताची काकड आरती, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, गोंधळ, जागरण या सर्व गोष्टींवर परिणाम होईल. कायद्याप्रमाणे पोलिसांची परवानगी घेऊन सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भोंगे लावण्यास परवानगी आहे, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले. तसेच जनतेनं शांत राहावे. कायदा आणि सुव्यवस्था म्हणून प्रश्न उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहनही दिलीप वळसे पाटील यांनी केलं.
Web Title: Dilip Walse Patil On Action Against Aurangabad Raj Thackeray Sabha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..