शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणांबाबत करा संघटनांशी चर्चा 

संतोष सिरसट 
Thursday, 9 July 2020

धोरण सर्वसमावश, पारदर्शक असावे 
शिक्षकांच्या बदल्यांचा धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी शिक्षक संघटनांबरोबर चर्चा केल्यास सर्वसमावेशक, पारदर्शक आणि सर्व घटकांना समन्यायी धोरण तयार करता येईल, असा विश्‍वास शिक्षक समितीने व्यक्त केला आहे. याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंदकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचेही श्री. कादे यांनी सांगितले. 

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जुलै महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांचे धोरण अंतिम करण्यापूर्वी राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करावी. त्यानंतरच शिक्षक बदल्यांचा नवीन आदेश काढावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी ग्रामविकास विभागाकडे केल्याची प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कर्मचारी, शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांना चार मेच्या आदेशाने स्थगिती दिली होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने सात जुलैच्या आदेशाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरील स्थगिती उठवली असून 31 जुलै पर्यंत बदल्यांची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार केली जाते. मागील दोन वर्षात झालेल्या शिक्षकांच्या बदल्या फेब्रुवारी 2017 च्या बदली धोरणामुळे वादग्रस्त ठरल्या होत्या. न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्याने ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शिक्षकांच्या बदली धोरणाचा अभ्यास करून सर्वसमावेशक बदली धोरण तयार करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेझाली अभ्यासगट नेमला होता. त्यानुसार नवीन बदली धोरण तयार केले जाणार आहे. मात्र, राज्यातील शिक्षकांच्या बदली धोरणाचा निर्णय घेणापूर्वी शिक्षक संघटनांची ऑनलाईन बैठक घेऊन धोरणाच्या मसुद्यावर चर्चा करावी. सहमतीने बदली धोरण निश्‍चित करावे, शिक्षक समितीने केल्याचे जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discuss teacher transfer policies with organizations