‘आदिवासी कलांना व्यासपीठ मिळवून देणार’

मंगेश महाले
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पाचव्या आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची निवड झाली आहे. वडजी (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे १७ नोव्हेंबर रोजी हे साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्ताने गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद!

पाचव्या आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुनील गायकवाड यांची निवड झाली आहे. वडजी (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे १७ नोव्हेंबर रोजी हे साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्ताने गायकवाड यांच्याशी साधलेला संवाद!

प्रश्‍न - आदिवासी संमेलनाध्यक्षपदी निवडीबाबत?
आतापर्यंत विविध साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, विविध चळवळींचे साहित्य संमेलन, अखिल भारतीय पातळीवर संमेलन यांचे अध्यक्ष व आदिवासी साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष यात फरक आहे. व्यवस्थेने माझ्या बापाला चोर, दरोडेखोर ठरविले होते. आज एका दरोडेखोराचा मुलगा पाहिल्यांदा साहित्य संमेलनचा अध्यक्ष होणे ही शिक्षणाच्या परिवर्तनाने घडलेली घटना आहे. आदिवासी साहित्यातच नव्हे तर मराठी साहित्यात घडलेली पहिली ऐतिहासिक घटना आहे. 

प्रश्‍न - आदिवासी साहित्य आणि प्रस्थापित साहित्य यांच्याच फरक काय?
आमचे आदिवासी साहित्य प्रस्थापित साहित्यासारखे नसेन, पण कमकुवत नाही. ते मान हलवणारे साहित्यही नाही तर क्रांती करणारे साहित्य आहे. जगातील सर्वांत जुनी संस्कृती म्हणून आदिवासी संस्कृती ओळखली जाते. या आदिवासी संस्कृतीला खूप मोठा इतिहास आहे. अकादमीने केलेल्या निवडीमुळे जबाबदारी वाढली आहे.

प्रश्‍न - आपल्या भिलाऊ बोलीविषयी सांगा 
सातवीपर्यंत मी वर्गात भिलाऊ बोली बोलत होतो. मला मराठी भाषा समजलीच नाही. माध्यमिक शाळेत तोडकी मोडकी मराठी भाषा शिकलो. त्यामुळे बोलीभाषेवर मी जीवापाड प्रेम केले. या बोलीभाषेनेच मला या आदिवासी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानापर्यंत पोचविले. हा या बोलीभाषेचा सन्मान आहे. आदिवासी साहित्य अकादमीने नक्कीच सारासारविचार करून एका भिलाटीच्या पोराला सन्मान देऊन त्याच्या बोलीचा साहित्याचा सन्मान केला.
 
प्रश्‍न - आपल्या लिखाणाची प्रेरणा कोणती आहे?
वास्तव जीवन जगलो तेच साहित्यात मांडले. माझ्या साहित्यातील माणसे ही माझी माणसे आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही त्यांचे किड्यामुंगीचे जिणे, जगणे संपले नाही, ही सध्याच्या भिलाटीची परिस्थिती आहे. येथील माणसे, त्यांची दुःखे, वेदना, जखमा, दारिद्य्र, अन्याय, अत्याचार मांडण्याचा मी प्रयत्न केला. ही माणसचे माझ्या लिखाणाची प्रेरणा आहे.  

प्रश्‍न - आपल्या ‘बाडगी नी धार’ या आत्मकथानकाविषयी सांगा.
मी जमीनदाराचा शोषित, पीडित माणूस आहे. वडिलांनी आजोबांविरुद्ध विद्रोह पुकारून दरोड्याचा मार्ग चांगला नाही मग ‘बाडगी नी धार’ सुरू केली. पण पोलिसांचा ससेमिरा चुकला नाही. तीही बंद करून सालदारकी, जागली सुरू केली. बापाची सालदारकी माझे दोन्ही हात विहिरीत मोडून गेली. नव्वद फूट विहिरीत पडल्याने हात निकामी झाले. मी डाव्या हातांनी लिहायचो. पण तो हातच निकामी झाला. मी त्याचे भांडवल केले नाही, मी उजव्या हाताने शिकलो तसा उजवा हातही मोडलाय; पण डाव्या हातापेक्षा उजव्या हाताला वेदना कमी झाल्या होत्या हे सारं जिणं ‘बाडगी नी धार’मध्ये मांडल. 
 
प्रश्‍न - आदिवासी साहित्य अकादमी सध्या काय काम करीत आहेत?
आदिवासी साहित्यिकांचे साहित्य एकत्रित करून आदिवासी साहित्य खंड तयार करण्याचे काम आदिवासी साहित्य अकादमी करीत आहे. अखिल भारतीय पातळीवरील आदिवासी साहित्यिकांची साहित्य सूची व साहित्यिक परिचय पुस्तिकेचे काम सुरू आहे. आदिवासी साहित्याला राज्य अभ्यासक्रम मंडळाने न्याय द्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे. आदिवासी साहित्य अकादमीकडून दरवर्षी एका गरीब आदिवासी हुशार मुलाचा शोध घेऊन त्याला दर्जेदार शिक्षण देणार आहे.  

प्रश्‍न - आदिवासी बोलीच्या संवर्धनाविषयी?
भिलाऊ, तडवी, अफणबोली, पावरी, भिलोरी, मावची, डोगरी, धनका, या बोलीच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. तूरवाद्य, पावरी वाद्य, डोगऱ्या देव नाच, भिलाऊ नाच, ढोल वाद्य, तारपा नाच याविषयी संशोधन व या कलांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discussion with sunil gaikwad