esakal | मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून मराठा कार्यकर्त्यांत मतभेद
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून मराठा कार्यकर्त्यांत मतभेद

आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्यांना न्याय नाही

मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून मराठा कार्यकर्त्यांत मतभेद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आषाढीतील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, या सत्कारावरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसंग्राम संघटनेसह नऊ संघटनांनी सत्कार करण्याची तयारी सुरू केलेली आहे. दुसरीकडे, संभाजी ब्रिगेड व शिवक्रांती या दोन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या सत्काराला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्यांच्या वारसांना अद्याप नोकऱ्या देण्यात आलेल्या नसून, आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे अजून मागे घेण्यात आलेले नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षणाच्या संदर्भात निर्णय झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून त्यांना श्रेय देणे योग्य नाही, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, रामभाऊ गायकवाड यांनी घेतली आहे. संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे "सकाळ'शी बोलताना म्हणाले.

राजकीय भूमिकेतून काही मंडळींनी पत्रकार परिषद घेतली. आपण त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतो. परंतु, आपण कोणतीही भूमिका मांडली नव्हती. ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता; त्या कार्यकर्त्यांचा आणि संभाजी ब्रिगेडचा या सत्काराला विरोध आहे.' दरम्यान, शिवसंग्राम संघटनेसह नऊ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराची तयारी सुरू केली आहे. या संघटनेचे पंढरपूर विभागाचे अध्यक्ष सुधीर धुमाळ यांनी सांगितले की, मराठा समाजाशी संबंधित नऊ संघटनांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला जाणार आहे.

loading image