Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायतींची रणधुमाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायतींची रणधुमाळी

सोलापूर : राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २३ महापालिका, २२० नगरपरिषदा व नगरपालिका आणि २८४ पंचायत समित्यांची मुदत संपून आता सात महिने पूर्ण झाले आहेत. पण, प्रभागरचनेचा तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही. त्याच दरम्यान, आता पुढील दीड महिन्यांत तब्बल सात हजार ६०० ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबरअखेरीस ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा घेण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे.

मार्च २०२२मध्ये राज्यातील बहुतेक महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्या आणि नगरपालिकांची मुदत संपली. पण, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा न्यायालयात सुरु असल्याने तत्कालीन सरकारने निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता आरक्षणाचा निर्णय झाला, पण तत्कालीन सरकारने प्रभाग रचनेत केलेल्या बदलला शिंदे-फडणवीस सरकारने न्यायालयात आव्हान दिले.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ दिली. २०११च्या जनगणनेऐवजी सध्याची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग रचनेत बदल करण्यात आला व प्रभाग रचनाच बदलली. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात १९ ऑक्टोबरला सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिल्याने आता सुनावणी नोव्हेंबरच्या मध्यावधीत होईल. त्याच दरम्यान ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंचा गट व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा तिढा देखील सुटला आहे. त्यामुळे पहिल्यांदा साडेसात हजार ग्रामपंचायतींची निवडणूक उरकली जाईल,अशी माहिती ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तीन टप्प्यांत सलग घेतल्या जाणार आहेत, असेही सांगण्यात आले.

निवडणुकीचे संभाव्य तीन टप्पे

ग्रामपंचायत निवडणूक : २० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर

महापालिका, नगरपालिका : २० डिसेंबर २०२२ ते २५ जानेवारी २०२३

जिल्हा परिषद, पंचायत समिती : ३० जानेवारी ते २० फेब्रुवारी