
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताब्यात देशाची सत्ता आल्यानंतर, भाजपने गेल्या पाच वर्षांत शिवसेनेला दुय्यमच वागणूक दिली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चार वर्षांत भाजपवर तोंडसुख घेतले असले, तरी सत्तेत मिळत असलेला थोडाफार वाटा सोडला नाही. त्यांनी वाद वाढविला असता, तर संघटनेतून सत्तेच्या लालसेने काही मोहरे गळाले असले.
भाजपसमवेत युती झाली असली, तरी शिवसेनेची वाट खडतरच आहे. गेल्या वेळी जिंकलेल्या जागा राखण्यासाठी स्पर्धा करतानाच, अन्य मतदारसंघांत त्यांना आघाडी व अन्य पक्षांच्या मातब्बर उमेदवारांशी सामना करावा लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताब्यात देशाची सत्ता आल्यानंतर, भाजपने गेल्या पाच वर्षांत शिवसेनेला दुय्यमच वागणूक दिली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चार वर्षांत भाजपवर तोंडसुख घेतले असले, तरी सत्तेत मिळत असलेला थोडाफार वाटा सोडला नाही. त्यांनी वाद वाढविला असता, तर संघटनेतून सत्तेच्या लालसेने काही मोहरे गळाले असले. त्यामुळे पक्ष वाचविण्यासाठी त्यांनी दोन्ही बाजूने कसरत सुरुच ठेवली. त्यामुळे, पक्षातील सत्तेचा फायदा घेणारेही खूष राहिले, तर भाजपविरोधी भुमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांचेही थोडेफार समाधान झाले.
शिवसेनेची मुत्सद्देगिरी
शिवसेनेला खरी संधी मिळाली, ती लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या वाटाघाटीत. त्यावेळी पुन्हा बहुमत मिळविण्याची शक्यता कठीण वाटत असल्याने, भाजपने शिवसेनेच्या अटी मान्य करीत युती टिकविली. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वांधिक जागा शिवसेनेच्या आहेत. मात्र, एकहाती सत्ता मिळाल्यानंतर, भाजपने शिवसेनेची एकाच मंत्री पदावर बोळवण केली. भाजपने रंग पुन्हा बदलला. राज्यात युतीमध्ये जागा व सत्ता वाटपात निम्मा वाटा हे शिवसेनेला दिलेले आश्वासन पाळण्याचे भाजपने टाळले. शिवसेना स्वतःहून युती तोडेल, ही भाजपची अपेक्षा शिवसेनेच्या नेत्यांनी पूर्ण केली नाही. कमी जागा मिळाल्या, तरी शेवटपणे ताठरपणा दाखवितानाच शिवसेनेने सध्यातरी तडजोडीची भूमिका घेतली. भाजपबरोबर दोन हात करण्यात सध्यातरी अवघड असल्याचे वास्तव त्यांनी स्वीकारले.
शिवसेनेने कार्यकर्त्यांना जपले
युतीच्या जागा वाटपात 124 जागा मिळाल्या, तरी पूर्वी युतीच्या जागा वाटपात "नऊ' हा आकडा शुभ मानला गेला. त्यानुसार, शिवसेनेने 126 जागांवर उमेदवार उभे केले. कोकणात राणे, तर साताऱ्यातील माणमध्ये जयकुमार गोरे या भाजप उमेदवारांच्या विरोधातही शिवसेना लढत आहे. कल्याण, नाशिक येथे लढणाऱ्या बंडखोरांच्या पाठिशी शिवसैनिक राहिले. उमेदवारी वाटप करताना, शिवसेनेने विद्यमान आमदारांना डावलले नाही. शिवसेनेच्या 63 आमदारांपैकी 54 जणांना पुन्हा लढण्याची संधी मिळाली. तिघांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच पक्ष सोडला. त्यापैकी दोघेजण काँग्रेस व भाजपचे खासदार झाले. हर्षवर्धन जाधवाच्या बंडखोरीमुळे औरंगाबादमध्ये एमआयएमचा खासदार झाला. आमदार तृप्ती सावंत व नारायण पाटील यांनी बंडखोरी केली. मात्र, जागा वाटपावरून फारसे वाद झाले नाहीत.
राष्ट्रवादीच्या तीन, काँग्रेसच्या तीन आणि बहुजन विकास आघाडीचा एक अशा आठ आमदारांना पक्षात प्रवेश देत शिवसेनेने उमेदवारी दिली. त्यामध्ये जयदत्त क्षीरसागर, दिलीप सोपल, निर्मला गावीत, भास्कर जाधव, अब्दुल सत्तार आदींचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त आघाडीतून आलेल्या काही मातब्बरांनाही उमेदवारी दिली.
मुंबई, कोकणावर शिवसेनेची भिस्त
युतीच्या जागा वाटपात मुंबई व कोकणातील 75 जागांपैकी शिवसेना 45 जागांवर लढत आहे. शिवसेनेचे 28 आमदार या भागांतील आहेत. त्यामुळे, पक्षातील फुटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोकणात कमकुवत झाली आहे. मुंबईत काँग्रेसचे फारसे आव्हान नाही. त्यामुळे, मुंबई, कोकणातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याकडे शिवसेनेचा कल आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यंदा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. या भागात शिवसेनेचे आमदार वाढतील.
पश्चिम महाराष्ट्रात जागा टिकविण्याचे आव्हान
काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने या वेळी पश्चिम महाराष्ट्र तगडे आव्हान उभे केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचे तेरा आमदार असून, त्यामध्ये कोल्हापूरात सहा व पुण्यात तीन, तर अन्य चार जिल्ह्यांत प्रत्येकी एक जागा आहे. यापैकी काहीजण यंदा पराभूत होण्याच्या स्थितीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील 70 मतदारसंघांपैकी 32 जागांवर शिवसेना लढत आहे. 2014 च्या मोदी लाटेत तावून सुलाखून निघालेल्या राष्ट्रवादीच्या अकरा, तर काँग्रेसच्या सहा आमदारांपुढे शिवसेना उभी ठाकली आहे. काही ठिकाणी त्यांनी आघाडीतील नेत्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे.
मराठवाड्यात युतीत वाद
मराठवाड्यातील 46 पैकी 22 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. मराठवाड्यातील पक्षाच्या अकरा आमदारांपैकी सातजण नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी दोघांनी शिवसेना सोडली. या दोन जिल्ह्यांवरच शिवसेनेची भिस्त आहे. तेथे शिवसेना 11 जागांवर लढत आहे. मात्र, त्यांच्यासमोर तगडी आव्हाने आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, तर औरंगाबादमध्ये एमआयएमची वाढलेली ताकद यांचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर युतीच्या कार्यकर्त्यांत टोकाचे वाद सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीतून आलेले जयदत्त क्षीरसागर, तसेच तानाजी सावंत या दोन मंत्र्यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. मराठवाड्यात जागा राखण्यात शिवसेनेला यश आले तरी पुरेसे आहे.
उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या बंडखोरीचा त्रास
उत्तर महाराष्ट्रातील 35 जागांमध्ये शिवसेनेच्या एकूण सात आमदारांपैकी नाशिकमध्ये चौघे, तर जळगावमध्ये तिघेजण आहेत. जळगावांतील चारही जागी भाजपचे बंडखोर असल्याची तक्रार शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या वेळी करीत होते. नाशिकमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपच्या आमदारांविरुद्ध बंडाचा झेंडा फडकाविला आहे. उत्तर महाराष्ट्रात वीस जागांवर शिवसेना लढत असून, तेथे युतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपची साथ जवळपास नसल्यात जमा आहे. त्यामुळे शिवसेनेला स्वबळावरच लढावे लागणार आहे.
विदर्भात स्थानिकांवरच भिस्त
विदर्भात भाजपची एकहाती सत्ता असल्याने, 62 पैकी 50 जागा भाजपच्या वाट्याला गेल्या. विदर्भात खासदार आहेत, पण आमदार नाहीत, अशी शिवसेनेची स्थिती आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे केवळ चार आमदार निवडून आले. त्यापैकी बाळू धानोरकर हे काँग्रेसमध्ये गेले व चंद्रपूरचे खासदार झाले. त्यांच्या मतदारसंघात धानोरकर यांच्या पत्नीविरुद्ध शिवसेनेने भाजपच्या संजय देवतळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या पाच जिल्ह्यांत तर भाजपने शिवसेनेला जागाही सोडली नाही. विदर्भात शिवसेना लढत असलेल्या बारा मतदारसंघांमध्ये त्यांना गेल्या वेळी मोदी लाटेतही निवडून आलेल्या काँग्रेस व अन्य पक्षांच्या आमदारांविरुद्ध लढावे लागत आहे. त्यामुळे, विदर्भात शिवसेनेला फारशा आशा नाहीत. स्थानिक समिकरणांच्या जोरावर निवडून येणाऱ्या उमेदवारांवरच त्यांची भिस्त आहे.