'साहेब किंवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

माळेगाव- लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका. मित्रपक्षांना बरोबर घेवून खरेतर भाजप व शिवसेनेचे जातियवादी सरकार घालवून काँग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत मिळविण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच भाजपचा पाच राज्यात पराभव झाल्यामुळेच त्यांना कर्जमाफीच्या चर्चेतून आता शेतकऱ्यांची आठवण होऊ लागल्याचा टोलाही पवारांनी मारला.

माळेगाव- लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका. मित्रपक्षांना बरोबर घेवून खरेतर भाजप व शिवसेनेचे जातियवादी सरकार घालवून काँग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत मिळविण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच भाजपचा पाच राज्यात पराभव झाल्यामुळेच त्यांना कर्जमाफीच्या चर्चेतून आता शेतकऱ्यांची आठवण होऊ लागल्याचा टोलाही पवारांनी मारला.

पणदरे-कुरणेवाडी (ता.बारामती) येथे उद्योजक नितीन जगताप यांच्या उत्कर्ष लाॅन्स या नविन मंगल कार्यालयाच्या भूमिपुजन कार्यक्रमाच्या नमित्ताने शेतकरी मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. कांदा, साखर, दूधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारच्या विरुद्ध उद्रेक झाला. भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठीच पाच राज्यांच्या निवडणूकात शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळेच आता केंद्राकडून पुन्हा कर्जमाफीची चर्चा केली जात आहे, अर्थात गमावलेला जनाधार मिळविण्याचा केविलवाणी प्रकार भाजपवाल्यांकडून केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

ते म्हणाले, शेतीसह उद्योग धंद्यात मंदी, दुष्काळी स्थिती, कर्जमाफीचे धरसोडीचे धोरण असल्याने बॅंकाच्या वसूलीवर विपरित परिणाम झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना बॅंका दारात उभे करीत नाहीत, याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार आहे. बेरोजगारीसह निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीवर मार्ग काढण्याऐवजी हे सरकार राम मंदीर, हनुमानाची जात, पुतळे उभारणी, धार्मिक प्रश्न, शहरांची नावे बदलण्याची चर्चा करीत आहे. त्यात शिवसेनेचा दुटप्पीपणा तर लोकांना नकोसा झाला आहे. लोकसभेच्या जागा वाटपाचा अंतिम टप्पा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींनी गाठला आहे. त्या प्रक्रियेत खरेतर निवेदिता माने यांनी संयम राखणे आवश्यक होते. परंतु मित्रपक्षाचे राजू शेट्टींना जागा जाईल असे गृहित धरून त्यांनी शिवसेनेत जाण्याचा मार्ग स्वीकारला, असे पवार यांनी सांगितले. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सभापती संजय भोसले, संदीप जगताप, संभाजी होळकर, योगेश जगताप, रविराज तावरे, रोहित कोकरे, सतिश तावरे, कुरणेवाडीचे सरपंच अलंकार जगताप आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.

उत्कर्ष ग्रुफचे सेवाभावी काम..!
शेतकऱ्यांचा मुलगा नितीन जगताप यांनी उत्कर्ष ग्रुफच्या माध्यमातून स्वतःची तर दैदिप्यमान प्रगती केलीच, शिवाय बारामतीच्या ग्रामिण भागात बस स्टॉप, कुरणेवाडीकडे जाणारा रस्त्यासाठी जागा देणे, विठ्ठल माध्यमिक संस्थेच्या इमारतीला मदत करणे आदी विधायक कामांसाठी त्यांनी मोठा स्वःनिधी गावकऱ्यांना दिला. आता बारामतीच्या वैभवात भर घालणारे उत्कर्ष लॉन्स, या नविन मंगल कार्यालयाची उभारणी नितीनकडून होत असल्याचा आनंद वाटतो, असे गौरोद्घागार अजित पवार यांनी काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not discuss the name Of me and Sharad Pawar For Prime minister and chief minister