मंत्रिमंडळात परतण्याची इच्छा नाही - खडसे

पीटीआय
सोमवार, 14 मे 2018

'पालघरमध्ये चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेनेने स्वपक्षात घेणे हे चुकीचे होते; मात्र आम्हीही (भाजप) शेवटच्या क्षणी राजेंद्र गावितांना पक्षात घेऊन त्यांना तिकीट दिले. अशा घटनांमुळे पक्षाचे मनोधैर्य कमी होते.''
- एकनाथ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते

मुंबई - 'माझ्या अडचणीच्या काळात पक्ष माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला आहे. भाजपचा त्याग करणे हे माझ्या स्वप्नातही येऊ शकत नाही. मी कदापि भाजप सोडणार नाही आणि मला या मंत्रिमंडळात परतण्याची इच्छा नाही,'' अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज दिली.

खडसे यांनी आज "पीटीआय'ला खास मुलाखत दिली. गेल्या चार वर्षांत ज्या काही घडामोडी घडल्या, त्यावर अतिशय मोकळेपणाने त्यांनी संवाद साधला. भोसरी जमीन प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्याने खडसे पुन्हा मंत्रिमंडळात परणार याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. मात्र, खडसे यांनीच तशी शक्‍यता आज फेटाळून लावली. भोसरी प्रकरण, दाऊद प्रकरण आदी मुद्यांना स्पर्श करतानाच ते म्हणाले, 'एक वर्षाने राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. तसेच स्थानिक निवडणुकाही होत आहेत. त्यामुळे मला त्या दृष्टीने तयारी करायची आहे. त्यामुळे मला आता मंत्रिमंडळात परतण्याची कोणतीही इच्छा नाही. खूप काम करायचे आहे.''

ते म्हणाले, 'ज्यांनी माझ्यावर आरोप केला ते आता उघड्यावर पडले आहेत. मला राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या दोन वर्षांत माझ्यावर बरेच आरोप-प्रत्यारोप झाले. मंत्रिपद सोडावे लागले. त्यामुळे थोडा वेळ मिळाल्याने मी थोडे शेतीकडेही लक्ष दिले.

कृषी विभागात लक्ष घातल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही झाला. भविष्यात कोणते राजकारण आपण करणार आहात, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, 'सर्वच पक्षातील नेत्यांशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. अनेक पक्षांत माझे जीवलग मित्र असले तरी, मी भाजपचा आहे आणि भाजपचाच राहीन. पक्ष सोडण्याबाबत माझ्या मनात कोणताही विचार नाही. पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. भाजपने मला भरपूर दिले आहे. पक्षामुळेच मी घडलो आहे. संकटात पक्ष माझ्यामागे उभा राहिला आहे त्यामुळे पक्ष सोडण्याचा विचार माझ्या मनात कसा काय येऊ शकतो?''

'पालघरमध्ये चिंतामण वनगा यांच्या मुलाला शिवसेनेने स्वपक्षात घेणे हे चुकीचे होते; मात्र आम्हीही (भाजप) शेवटच्या क्षणी राजेंद्र गावितांना पक्षात घेऊन त्यांना तिकीट दिले. अशा घटनांमुळे पक्षाचे मनोधैर्य कमी होते.''
- एकनाथ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not want to return to Cabinet says Eknath Khadse