‘कलम ४२ ब’ माहितीय का? रहिवासी वापराची जमीन होणार बिनशेती; अपार्टमेंटमधील फ्लॅट नावावर नसल्यास ‘हा’ आहे पर्याय

शेतीच्या क्षेत्रावर (बिनशेती नसलेली जमीन) सध्या रहिवासी वापर होत असल्यास ती जमीन २०१७च्या राजपत्रातील ‘कलम ४२ ब’नुसार बिनशेती करता येते. त्यासाठी संबंधित जागा मालकाला तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो.
sakal exclusive
sakal exclusiveSAKAL

सोलापूर : शेतीच्या क्षेत्रावर (बिनशेती नसलेली जमीन) सध्या रहिवासी वापर होत असल्यास ती जमीन २०१७च्या राजपत्रातील ‘कलम ४२ ब’नुसार बिनशेती करता येते. त्यासाठी संबंधित जागा मालकाला तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर महापालिकेचा झोन दाखला, उताऱ्यावरील नावे व खरेदी कधीची आहे, याची पडताळणी करून त्या मालकाला बिनशेतीची परवानगी दिली जाते.

५ मे १९९२ रोजी शहराची हद्दवाढ करण्यात आली. त्याला आता २१ वर्षे पूर्ण झाली, तरीपण लोकांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. हद्दवाढीत शेळगी, दहिटणे, देगाव (बसवेश्वर नगरसह), कुमठे, केगाव, सोरेगाव (प्रताप नगरसह), बाळे, कसबे सोलापूर, मजरेवाडी या गावांचा समावेश झाला. अनेकांना अद्याप प्रॉपर्टी कार्ड मिळालेले नाहीत तर अनेकांनी घरे बांधली, पण त्यांच्या नावे जागा झालेली नाही.

अनेकांनी अंतिम ले-आऊट मंजूर नसतानाही अनेकांनी बांधकामे केली आहेत. दुसरीकडे अनेक विकासकांनी बिनशेती क्षेत्र नसतानाही त्याठिकाणी प्लॉटिंग केले आहे. अनेकजण आपली फसवणूक झाल्याच्या तक्रारी महापालिका, तहसील कार्यालय किंवा पोलिसांत करीत आहेत. पण, ‘कलम-४२ ब’नुसार तहसीलदारांकडे अर्ज केल्यावर त्या जागेला बिगरशेतीची (एनए) परवानगी मिळते, त्या जागेची खरेदी झाल्यापासूनचा दंड व रूपांतरित कर भरणे बंधनकारक आहे. हद्दवाढ भागातील परिसर बिगरशेती व्हावा हा त्यामागील मूळ उद्देश आहे.

परवानगीनंतर महापालिकेकडून पडताळणी नाहीच?

बांधकाम परवाना दिल्यानंतर रस्त्यासह खुली जागा नियमानुसार सोडली जाते का, परवानगीनुसार त्याठिकाणी बांधकाम केले जात आहे का, ‘साईड स्पेस’चा नियम पाळला जातोय का म्हणजेच दोन बांधकामात किमान तीन फुटाचे अंतर सोडले जाते का याची पडताळणी महापालिकेकडून केली जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यासह अनेक अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. प्राथमिक ले-आउट मंजूर असतानाही मोठ्यामोठ्या इमारती उभारल्या जातात आणि पुन्हा अडचणी निर्माण होतात अशीही उदाहरणे आहेत. यासंदर्भात गांभीर्याने विचार करून त्यासंदर्भात शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

नागरिकांनी ‘या’ बाबी पाहायलाच हव्यात

  • - जागा किंवा प्लॅट खरेदी करताना ‘कलम-४२ अ’नुसार त्या जागेचे ले-आऊट मंजूर असल्याची खात्री करा

  • - खरेदी करणारी जागा बिगरशेती असल्याची खात्री करून उताऱ्यावर नाव येण्यासाठी जागेची तत्काळ खरेदी करा

  • - २०२१पासून ले-आऊट व बिनशेती असल्याशिवाय त्या जागेची खरेदी-विक्री करण्याची प्रक्रिया झालीय बंद

  • - बांधकाम करताना दोन प्लॅाटमध्ये किमान तीन फुटांचे अंतर (साईड स्पेस) सोडणे बंधनकारक

अपार्टमेंटमधील प्लॅट तुमच्या नावावर आहे का?

अपार्टमेंट कायद्यानुसार ‘अपार्टमेंट डीड’अंतर्गत त्या जागेतील फ्लॅटधारकांना त्यांचा हक्क मिळतो. त्यासाठी सर्व फ्लॅटधारकांनी मूळ विकासकाला घेऊन जावून रजिस्टर कार्यालयातून अपार्टमेंट डीड करून घ्यावे लागते. त्यामुळे मूळ मालकासोबतच त्या अपार्टमेंटमधील प्रत्येक फ्लॅटधारकाचा हिस्सा निश्चित होतो. त्यामुळे कालांतराने त्या इमारतीचे बांधकाम नव्याने करताना मूळ मालकाबरोबरच प्रत्येक फ्लॅटधारकाचा त्यावर हक्क राहतो.

नागरिकांनी खबरदारी घ्यायलाच हवी

नागरिकांनी जागा किंवा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी त्या जागेचे ले-आऊट मंजूर आहे का, ते क्षेत्र बिनशेती आहे का, या दोन बाबींची पडताळणी जरूर करावी. जेणेकरून महापालिकेचा बांधकाम परवाना मिळेल, बॅंकेकडून कर्ज देखील घेण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

- सैफन नदाफ, तहसीलदार, उत्तर सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com