
सोलापूर : सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला मागील दीड वर्षांपासून पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. सध्याचे अध्यक्ष रविराज फल्ले यांच्याकडे तब्बल १० जिल्ह्यांच्या समित्यांचा पदभार आहे. त्यामुळे कास्ट व्हॅलिडीटी प्रमाणपत्रांवर मुंबईत जाऊन स्वाक्षऱ्या आणाव्या लागत आहेत. २५ दिवसांत ७०० प्रमाणपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या आणल्या असून आणखी ५०० प्रमाणपत्रे स्वाक्षरीसाठी मुंबईला पाठविली आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (सीईटी, नीट) परीक्षा काही दिवसांवर आल्याने प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी हेलपाटे मारत असल्याची वस्तुस्थिती आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘नीट’ ४ मे रोजी होणार आहे. तर राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ९ ते १९ एप्रिल या कालावधीत ‘सीईटी’ घेण्यात येणार आहेत. अभियांत्रिकी फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणारी ‘सीईटी’ वेळापत्रकानुसार होणार आहे. तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाची ‘सीईटी’ २० ते २१ मार्च रोजी तर ५ वर्षे विधीची ‘सीईटी’ २८ एप्रिल रोजी होणार आहे. एम.सी.ए.ची सीईटी परीक्षा २३ मार्चला तर एम.बी.ए.ची सीईटी परीक्षा १ ते ३ एप्रिल दरम्यान होईल. बी.बी.ए., बी.सी.ए. अभ्यासक्रमाची ‘सीईटी’ ३० एप्रिल ते ३ मे या कालावधीत होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक ‘सीईटी’ सेलच्या वेबसाइटवर (https://cetcell.mahacet.org) उपलब्ध आहे.
दरम्यान, व्यावसायिक शिक्षणास प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) आवश्यक असते. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्व जात पडताळणी समित्यांकडे अर्जांचा ओघ वाढल्याची स्थिती आहे. सोलापूरच्या समितीकडे दररोज १०० हून अधिक अर्ज दाखल होत आहेत. पण, समितीचा कारभार सध्या सदस्य सचिवांवरच सुरु असून सांगली समितीचे सदस्य सध्या सोलापूरच्या समितीचे प्रभारी काम पाहात आहेत. तर अध्यक्षांकडे दहा जिल्ह्यांचा कार्यभार असल्याने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी विलंब होत असल्याची गाऱ्हाणे ऐकू येत आहेत.
सोलापुरातील प्रमाणपत्रांची स्थिती
प्रभारी अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या
७००
स्वाक्षरीस पाठविलेली प्रमाणपत्रे
५००
तपासणीसाठी प्रलंबित प्रकरण
सुमारे २०००
वेळेत प्रमाणपत्रे देण्याचे प्रयत्न
सोलापूरच्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे कास्ट व्हॅलिडीटीसाठी अर्जांची संख्या वाढत असून सर्वांना वेळेत प्रमाणपत्रे मिळावीत याची खबरदारी घेतली जात आहे. समितीकडे सध्या प्रलंबित अर्जांची तपासणी सुरू असून त्यांनाही लवकरच मुदतीत प्रमाणपत्रे मिळतील.
- सचिन कवले, सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.