esakal | राज्यात ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चा प्रभाव
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

राज्यात ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चा प्रभाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) तपासलेल्या ३६१ नमुन्यांपैकी तब्बल २२० म्हणजेच ६१ टक्के नमुने कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे असल्याची बाब पुढे आली आहे. हे नमुने जानेवारी ते मार्चदरम्यान राज्यातील विविध भागांतून घेण्यात आले होते. ‘एनआयव्ही’कडील आकडेवारीनुसार, जानेवारी महिन्यात ठाणे आणि अकोला जिल्ह्यांत कोरोनाचा डबल म्युटंट स्ट्रेन (बी.१.६१७) आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, नागपूर, पुणे, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील ५० टक्के नमुन्यांमध्ये हा स्ट्रेन आढळला. या जिल्ह्यांतून प्रत्येकी १० ते ३० नमुने घेण्यात आले होते.

राज्यात दररोज सरासरी ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येण्यामागे ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चा प्रभाव असू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. केंद्राने देखील गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील १५ ते २० टक्के नमुने हे ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चे असल्याचे स्पष्ट केले होते. विविध जिल्ह्यांतून गोळा करण्यात आलेले हे नमुने अत्यंत कमी आहेत. सध्या हाती आलेले नमुने हे एक टक्कादेखील नाहीत. त्यामुळे हाच स्ट्रेन रुग्णवाढीला कारणीभूत असेल असा दावा सध्या तरी करता येणार नाही, असे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: राज्यात निर्बंध असताना, प्रवास करायचा आहे? काय आहेत नियम?

अमरावती, अकोल्यात सर्वाधिक प्रभाव
कोरोनाच्या ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चा सर्वाधिक प्रभाव हा अमरावती व अकोला जिल्ह्यांत असल्याचे निदर्शनास आले आहे. अकोल्यातील ८५.२ टक्के (३४ पैकी २७) नमुन्यात हा स्ट्रेन आढळून आला; तर अमरावतीतील ६९.३ टक्के (९८ पैकी ६८) नमुन्यांत हा स्ट्रेन आढळला आहे.

राज्यात डबल म्युटेशनचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये स्ट्रेनमध्ये संसर्गाचा वेग अधिक असल्याने रुग्णसंख्येत वेगाने वाढ होते, परंतु हा विषाणू फारसा घातक नसल्याने घाबरण्याचे कारण नाही.- डॉ. अविनाश सुपे, सदस्य, राज्य कोविड टास्क फोर्स

हेही वाचा: पुणे : रेमडेसिव्हिरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या

डबल म्युटंट स्ट्रेन म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या स्ट्रेनमुळे कोरोनाची लागण होते. म्हणजेच त्याच्या नमुन्यामध्ये कोरोना विषाणूचे दोन प्रकार आढळतात. अशा प्रकारचे पहिले प्रकरण ब्राझीलमध्ये समोर आले होते.