ज्ञानदेव बैसले समाधी

dyaneshwar-maharaj
dyaneshwar-maharaj

गेले दिगंबर ईश्‍वर विभूती। राहिल्या त्या कीर्ति जगामाजी।।१।।
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी। आता ऐसे कोणी होणे नाही ।।२।।

होय! संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे ‘आता कोणी ऐसे होणे नाही’ हे ज्ञानदेवाविषयी व्यक्त केलेले कृतज्ञताभाव ज्ञानेश्‍वरांच्या अलौकिकतेचे प्रतीक आहे. सर्वसामान्यांना सामावून घेऊन अध्यात्माचे सोपे ज्ञान हे ज्ञानेश्‍वरांनी भागवत धर्म अर्थात वारकरी संप्रदायाच्या रूपाने दिले.

ज्ञानेश्‍वर महाराजांनी आळंदीस शके १२१८ कार्तिक वद्य १३ गुरुवारी मध्यान्हकाळी समाधी घेतली. त्यांच्या समाधीचे वर्णन अत्यंत रसाळपणे नामदेवांच्या ‘समाधीचे अभंग’ यात आहेत. त्याशिवाय भक्त कथामृतसार, महिपतिकृत संतलीलामृत, नरहरिमालुकृत भक्तकथामृत, निरंजन माधवकृत ज्ञानेश्‍वर विजय इत्यादी अनेक ग्रंथांत ते आले आहे. त्या सर्वांत नामदेव हे ज्ञानेश्‍वरांच्या नित्य संगतीतील प्रेमळ भक्त असून, त्यांनी तो मनोहर प्रसंग स्वतःच्या डोळ्यांनी पाहून हुबेहुब वर्णन केला, असे नमूद केले आहे.  ज्ञानेश्‍वरांच्या समकालीन विसोवा खेचर, नामदेव, जनाबाई, जगमित्र चोखोबा इत्यादी संत त्या दिव्याप्रसंगी उपस्थित होते. ज्ञानेश्‍वर महाराजांनी संप्रदायाप्रमाणे चंद्रभागेचे स्नान केले. पुंडलिकाचे दर्शन घेतले व देवळात श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन घेण्याकरिता ते गेले. आपले ईप्सित कार्य पूर्ण झाल्याचे मनोगत त्यांनी साक्षात पांडुरंगास सांगून समाधी घेण्याबद्दलचा मनोदय व्यक्त केला. विसोबा खेचरांनी अलंकापुरी ‘श्री गुरू ज्ञानाई माउली’ राहिल्याचे सांगून समाधी क्षणी जोडोनिया दाही’ म्हणत वंदन केले. संत नामदेव यासंबंधी ‘समाधि निधान संजीवनी’ असे वर्णन करतात. जनाबाई ‘धन्य हा निधान ज्ञानदेव’ म्हणतात, तर चोखा मेळा, ‘समाधी निर्धार संजीवनी’ असे या प्रसंगाचे वर्णन करतात. 

समाधीचे अभंग ः समाधी प्रकरणांवर नामदेवांचे २५० वर अभंग आहेत. ज्ञानी संत ज्ञानेश्‍वर समाधीस बसणार, सगुण मूर्ती ज्यांच्या मुखातून वेदान्त ऐकला ती मूर्ती डोळ्यांपुढून जाणार, या प्रसंगाने नामदेवांचा जीव कासावीस झाला. ज्ञानदेवांच्या संगतीत घेतलेले स्वसुख अनुभव, ज्ञान-वैराग्य हे त्यांना नजरेसमोर येऊ लागले. ज्ञानेश्‍वर आत्मरूप आहे, असे देवांनी त्यांना सांगितले. मात्र नामदेवांची खिन्नता अभंगातून ठायी ठायी व्यक्त होताना दिसते. 

नामा म्हणजे संत कासावीस सारे। लाविती पदर डोळियासी।।

आळंदीस इंद्रायणी (इंद्रस्थ अयनं यस्याम्‌ म्हणजे जिच्या तीरी इंद्राची तपाची जागा आहे.) नदी असून तिच्या काठावर श्री सिद्धेश्‍वराचे पुरातन स्थान आहे. तेथे सिद्धेश्‍वराच्या बाजूस अजानवृक्षाच्या छायेखाली एक दोन खणांची गुहा म्हणजे समाधिस्थान ज्ञानेश्‍वरांनी तयार करविले होते व त्या स्थानी समाधी घेण्यास ते सिद्ध झाले. नामदेवांनी आपल्या मुलांकडून समाधीची जागा झाडविली. एकादशीला सर्वांनी हरिजागर केला. तेव्हा नामदेवांनी कीर्तन केले. त्रयोदशीच्या दिवशी तुळशी, बेल अंथरून ज्ञानेश्‍वरांचे आसन तयार झाले. शिवाचा ‘ढवळा नंदी’ उठवून विवराची शिळा उघडली. नंतर-

ज्ञानदेव बैसले समाधी। पुढे अजान वृक्षनिधी
वामभागी पिंपळ आधी। सुवर्णाचा शोभत।।१।।

जयजयकाराच्या गर्जनेत ज्ञानेश्‍वर महाराज समाधीकडे जाण्यासाठी उठले. अवघ्यांनी त्यांना वंदन केले. ज्ञानेश्‍वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर सोपानदेव, चांगदेव, मुक्ताई व निवृत्तिनाथ यांनी वर्षभराच्या कालावधीतच आपले अवतार कार्य संपविले. 

श्री ज्ञानेश्‍वर महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या तात्त्विक पायाभरणीचे कार्य समर्थपणे केले. सर्वसामान्यांना सामावून घेणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या रूपाने ज्ञानोत्तर भक्तीचा मार्ग दाखविला. ज्ञानेश्‍वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, हरिपाठ आणि अभंगातून बोधामृत दिले. महायोगिराज तत्त्वज्ञ, वारकऱ्यांची माउली श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज हे वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असून, माउलींचा आशीर्वाद मिळावा म्हणून लाखो वारकरी वारीत सहभागी होऊन जीवनसार्थकतेचा आनंद घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com