''समीर वानखेडेंनी खोट्या गुन्ह्यात अडकवलं'', ड्रग्स प्रकरणातील आरोपीची न्यायालयात धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sameer wankhede

''समीर वानखेडेंनी खोट्या गुन्ह्यात अडकवलं'', ड्रग्स प्रकरणातील आरोपीची न्यायालयात धाव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप कऱण्यात आले. त्यानंतर एनसीबीकडून त्यांची चौकशी सुरू झाली. मात्र, आता एका ड्रग्स प्रकरणातील आरोपीने देखील वानखेडेंवर आरोप केले असून न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. वैयक्तीक वैर असल्यामुळे समीर वानखेडेंनी खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा गंभीर आरोप या अर्जात करण्यात आला आहे.

हेही वाचा: समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख

आरोपी झैद राणा याला त्याच्या मुंबईतील राहत्या घरातून एनसीबीने अटक केली होती. त्यावेळी आरोपीकडून १.३२ ग्रॅम एलएसडी, २२ ग्रॅम गांजा आणि गांजा जप्त केल्याचा दावा केला होता. वानखेडेंनी स्वतः हे ड्रग्स ड्रॉवर आणि स्कूटरमध्ये प्लांट केले होते, असा दावा आरोपी राणाने केला आहे. राणाची बाजू मांडणारे वकील अशोक सरोगी यांनी न्यायालयाला सांगितले की, ''आरोपी अंधेरीतील समीर वानखेडे यांच्या मालकीच्या फ्लॅटच्या शेजारील फ्लॅटमध्ये राहत होता. वानखेडे यांनी आपला फ्लॅट भाड्याने दिला. राणाचे आई-वडील आणि भाडेकरू यांच्यात किरकोळ वाद झाला. या कारणामुळेच समीर वानखेडे यांनी राणाविरोधात अर्जदाराच्या घरी ड्रग्स प्लांट केले. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहेत.''

वैयक्तिक वैर असल्यामुळे वानखेडेंनी खोटे आणि बनावट पुरावे तयार करून गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप याचिकेतून केला आहे. सीसीटीव्ही फुटेज एखाद्या योग्य एजन्सीच्या स्वतंत्र्य अधिकाऱ्याने संकलित करावे आणि न्यायालयात सादर करावे. नाहीतर ते फुटेज डिलिट केले जाण्याची दाट शक्यता आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.

जामीन याचिकेत असा दावाही करण्यात आला आहे की, ''सुरुवातीला पंच हे आर्यन खान प्रकरणातील पंचांसारखेच असल्याचे दाखवण्यात आले होते. वादानंतर खोटा आणि बनावट अहवाल तयार करून पंचनामे बदलण्यात आले," असे याचिकेत म्हटले आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी एनसीबीला 20 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

अर्जातून करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे उत्तर दाखल करेल. सात महिने राणा काय करत होता? आजपर्यंत त्याने तक्रार का नाही केली?, असे समीर वानखेडे यांनी इंडिया टूडेसोबत बोलताना सांगितले.

loading image
go to top