
पुन्हा ई-पास! दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पासची यंत्रणा लागू
पुणे : शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना महत्वाच्या कारणांसाठी आंतरजिल्हा किंवा परराज्यात प्रवास करण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयातर्फे ई-पास मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबरोबरच नागरिकांना स्थानिक पोलिस ठाण्यातूनही पास उपलब्ध होणार असल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र नागरिकांना हे ई-पास केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठीच मिळू शकणार आहेत. ज्या नागरिकांना ई-पासची आवश्यकता आहे, अशा नागरिकांना ई-पाससाठी covid19.mhpolice.in या लिंकवर अर्ज करावा लागणार आहे.
अशी आहेत ई-पास मिळविण्यासाठीची प्रक्रिया
- अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना प्रवासासाठी आंतरजिल्हा किंवा आंतरराज्य प्रवासासाठी प्रवास पासची गरज नाही
- पास मंजूर करणे किंवा नाकारण्याचा अधिकार पोलिस अधिक्षक किंवा शहरातील पोलिस उपायुक्तांना असणार आहे.
- अन्य सर्व वैयक्तीक व समुहांना या पद्धतीनुसार पास उपलब्ध होऊ शकतील.
- अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबी व्यवस्थित भरुन द्या
- अर्जासोबत जोडण्यासाठीची कागदपत्रे लिंकवर अपलोड करताना एकाच फाईलमध्ये एकत्र करा.
- अर्जासोबत जोडण्यासाठीच्या फोटोचा आकार हा 200 केबी व कागदपत्रांचा आकार हा 1 एमबी पेक्षा जास्त असू नये.
- संबंधित विभागाकडून पडताळणी व मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता
- संबंधीत विभागाकडून तुमचा अर्ज मंजुर झाल्यानंतर टोकन क्रमांक टाकून तुमचा ई-पास प्राप्त करून घ्या
- ई-पासमध्ये आपले तपशील, वाहन क्रमांक, वैधता आणि एक क्यूआर कोड असेल.
- संबंधीत ई-पासची एक प्रत तुमच्याजवळ ठेवा, त्याचबरोबर मोबाईलमध्येही त्याची "सॉफ्ट कॉपी' असू द्या. पोलिसांकडून विचारणा झाल्यानंतर पास दाखवा
- ई-पासचा गैरवापर करणे, मुदत संपल्यानंतरही वापर करणे किंवा विनापरवानगी पास वापरणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो, त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.
हेही वाचा: 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस; आंध्र प्रदेशचा कौतुकास्पद निर्णय
ई-पाससाठीची आपत्कालीन कारणे
- अत्यावश्यक सेवा
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती
- मृत्यु झालेल्या व्यक्तीचे प्रथम नातेवाईक
- तत्काळ वैद्यकीय उपचार
- लग्न
- अन्य
पोलिस महासंचालक कार्यालयाने ई-पाससाठी covid19.mhpolice.in ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. पुणे शहरातील नागरिकांनाही आपत्कालीन कारणासाठी आंतरजिल्हा किंवा परराज्यातील प्रवासासाठी लागणारे ई-पास संबंधीत लिंकवर उपलब्ध होतील.''
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त.
Web Title: E Pass System Applicable In Maharashtra Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..