शिवसेनेच्या 'या' नेत्यांमागे ED चा ससेमिरा, चार जण चौकशीच्या फेऱ्यात

Shivsena
ShivsenaMedia Gallery

मुंबई : आतापर्यंत अनेक नेते आणि मंत्र्यांना ईडीची आली असून ते चौकशीमध्ये अडकलेले आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मागे ईडीचा समेमिरा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या चार नेत्यांना ईडीने (ED notice to shivsena leader) समन्स बजावले असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत तीन नेत्यांना ईडीने चौकशीसाठी बोलाविले आहे.

Shivsena
अडसूळ यांच्यावर आरोप असलेला सीटी बँक घोटाळा नेमका आहे तरी काय?

प्रताप सरनाईकांपासून सुरुवात -

ठाण्यातील सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापासून शिवसेनेवर ईडी कारवाईचं सत्र सुरू झालं. सरनाईक यांच्यावर मनीलॉँडरींगचे आरोप करून त्यांना ईडीने समन्स बजावले होते. यावेळी त्यांचा मुलगा विंहग सरनाईक यांची देखील ईडीने चौकशी केली होती. सरनाईक यांच्या विहंग गृहनिर्माण कंपनीने एक गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला होता. यासाठी टिटवाळामध्ये काही जमिनी खरेदी केल्या होत्या. मात्र, सुमारे बावीस कोटी रुपयांच्या या व्यवहारात फसवणूक केली असा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये देशमुख आणि सरनाईक यांच्या खात्यात पैसे वळविले असा आरोप केला जात आहे. ईडीने सन 2014 मध्ये भूखंड ताब्यात घेऊन सर्व व्यवहार थांबविले आहेत. मात्र आता हा भूखंड पुन्हा विक्रीला काढल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर हा चौकशीचा फेरा सुरू झाला होता.

दुसरं टार्गेट भावना गवळी -

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ३० ऑगस्टला ईडीने छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. तसेच बालाजी पार्टीकल बोर्ड या कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप खासदार गवळींवर आहेत. याप्रकरणीच भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी वाशिम येथे बालाजी कारखान्याला भेट दिली होती. त्यानंतर आठ दिवसांतच ईडीने भावना गवळींच्या संस्थांवर छापेमारी केली होती. 'ईडी'ने रिसोड व देगाव येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, बीएएमएस कॉलेज तसेच रिसोड तालुक्यातील भावना अॅग्रो लिमिटेड या संस्थांशी संबंधित असलेल्या नऊ ठिकाणांवर छापे टाकले होते.

किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर अनिल परब ईडीच्या निशाण्यावर -

सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) बदल्यांचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोप केला होता. त्याबाबतचे पुरावे त्यांनी सक्तवसुली संचालनालय व आयकर विभागाला दिले होते. तसेच अनिल देशमुख प्रकरणात देखील अनिल परबांचा हात असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर ३१ ऑगस्टला पहिलं समन्स पाठविलं होतं. अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या १०० कोटी वसुली प्रकरणी पहिलं समन्स बजाविण्यात आलं होतं. आता देखील त्याचप्रकरणी नोटीस बजाविल्याची माहिती आहे. त्यावेळी मात्र नियोजित कार्यक्रमांचं कारण देत जबाब नोंदविण्यासाठी वेळ देण्याची मागणी त्यांनी केली होती. आता परत २५ सप्टेंबरला आणखी ईडीने समन्स बजाविलं होतं.

आता आनंदराव अडसूळ -

अडसूळ हे सिटी कोऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात ९०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. तसेच या बँकेच्या संचालक मंडळावर अडसूळांचे नातेवाईक होते. या बँकेत पेंशनधारक, तसेच ९९ टक्के मराठी लोकांचे खाते आहेत. या बँकेतून बिल्डरांना अवैधरित्या कर्ज वाटप करण्यात आले. त्यामधून अडसूळ यांनी कमिशन घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. कर्ज वाटपात अनियमितता आणि एनपीएमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे ही बँक गेल्या २ वर्षांपासून बुडीत आहे. याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांच्या घरावर आणि त्यांचे जावयांच्या घरावर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ईडीने छापेमारी केल्याची माहिती होती. त्यानंतर आनंदराव अडसूळ हे स्वतः चौकशीसाठी हजर झाले होते, अशी माहितीही त्यांनी माध्यमांना दिली. आता आज २७ सप्टेंबरला आनंदराव अडसूळांना परत एकदा ईडीने समन्स बजावले आहे. मात्र, ईडीचे अधिकारी घरी असतानाच त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे ते चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही, असे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com