राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते येणार अडचणीत; ईडीकडून आज चौकशी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

- पटेल यांनी सीजे हाउसमधील इक्बाल मिर्चीच्या मालकीचे दोन फ्लॅट विकत घेतल्याचा अधिकाऱ्यांचा संशय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) प्रफुल्ल पटेल यांची आज (शुक्रवार) चौकशी करण्यात येणार आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील सीजे हाउसमधील मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहाराबाबत त्यांची चौकशी केली जाणार आहे. पटेल यांची चौकशी ईडीच्या दक्षिण मुंबईतील बेलार्ड पियर्ड परिसरातील कार्यालयात केली जाणार आहे. पटेल यांनी सीजे हाउसमधील इक्बाल मिर्चीच्या मालकीचे दोन फ्लॅट विकत घेतल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणी अटक केलेल्या हरुण युसूफ व रणजीत सिंग बिंद्रा दलालांची चौकशी करण्यात आली. या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.

2007 मध्ये त्याचा विकास करार होऊन हस्तांतर करण्यात आले. पटेल यांची त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याची माहिती मिळत आहे. याच प्रकरणी आता चौकशी होणार आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्यादरम्यान पटेल यांची चौकशी केली जाणार असल्याने याचे राजकीय पडसाद कुठंही उमटू नये, याबाबत पोलिस आणि संबंधित प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ED to summon NCP leader Praful Patel in money laundering case today after he denies reports of alleged deal with Iqbal Mirchi