एकनाथ महाराजांच्या पालखीचे पैठणहून 16 जूनला प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

पंढरपूर - आषाढी पालखी सोहळ्यासाठी पैठणहून निघणाऱ्या श्री एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान 16 जून रोजी नाथ मंदिरातून होईल, अशी माहिती संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथबुवा पालखीवाले यांनी आज दिली.

पंढरपूर - आषाढी पालखी सोहळ्यासाठी पैठणहून निघणाऱ्या श्री एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान 16 जून रोजी नाथ मंदिरातून होईल, अशी माहिती संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथबुवा पालखीवाले यांनी आज दिली.

यंदाच्या पालखी सोहळ्यात 350 दिंड्या असून यामध्ये जवळपास 40 हजार वारकरी पायी चालत येणार आहेत. 300 किलोमीटर अंतर पायी प्रवासामध्ये 19 दिवसांचा मुक्काम राहणार आहे. या वर्षी तिथी कमी झाल्यामुळे प्रवासातील शिरढोण येथील एक मुक्काम कमी झाल्यामुळे 3 जुलै रोजी पालखी सोहळा पंढरपूर मुक्कामी विसावणार आहे.

पालखी सोहळ्यादरम्यान चार रिंगण होतात. यापैकी दुसरे रिंगण घुमरे पारगाव (जि. बीड) येथे होते. येथे जागा नाही. त्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी सोहळाप्रमुख रघुनाथबुवा गोसावी यांनी केली आहे. नाथ महाराजांच्या पैठण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून वारकरी करीत आहेत. पालखी मार्गाचे काम रखडले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मार्गासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र, इतर जिल्ह्यात अजूनही याबाबत ठोस कारवाई झाली नाही. दरम्यान, जुना पालखी मार्ग वगळून काही ठिकाणी मार्गात बदल केला आहे. पूर्वीच्या पालखी मार्गाचे काम सुरू करावे, अन्यथा या वर्षीही वारकरी आंदोलन करतील, असा इशाराही या वेळी देण्यात आला. यावर्षीपासून व्होळे येथील चंद्रभागा नदीमध्ये नाथांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान घालण्याची परंपरा सुरू केली जाणार आहे. यापूर्वी पालखी सोहळा नदीतून नेला जात असे. याठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला आहे. येथील ग्रामस्थ आणि भाविकांच्या भावनांचा आदर म्हणून चंद्रभागा स्नानाची परंपरा सुरू केल्याचेही श्री. गोसावी यांनी सांगितले.

Web Title: eknath maharaj palkhi departure from paithan on 16th june