
मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार? शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर
Maharashtra Cabinet Expansion : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जवळपास महिना पूर्ण होणार आहे. मात्र, अद्यापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे सर्वांचेच लक्ष याकडे लागून राहिलेले असून, उद्याच राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपसमारंभासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शिंदे आणि फडणवीस दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
दरम्यान, स्नेहभोजनाच्या कार्यक्रम म्हणून जरी शिंदे आणि फडणवीस राजधानी दिल्लीत जाणार असले तरी, या ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा होऊ शकते असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. स्नेह भोजनाच्या आजच्या कार्यक्रमात सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. स्नेहभोजनाचा कार्यक्रम सायंकाळी 7 ते 10 या वेळेत होणार आहे.
राज्यातील सरकार कायद्याला धरून नसल्याचे सांगत शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर बुधवारी सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरीव पुढील सुनावणी येत्या 1 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निकालामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असे कोणतेही कारण नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता लवकरच मंत्रिमंडलाचा विस्तार होईल अशी चर्चा रंगली असून, आजच्या शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात यावर नेमकी काय चर्चा होते हे पाहणे आणि त्यानंतर कोणला संधी दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.