

solapur stand
solapur
सोलापूर : तमिळनाडू येथील कोईम्बतूर जिल्ह्यातील पोदनूर येथून सोलापुरात आलेल्या कृष्णप्रसाद व्ही (वय ६३) यांचा एसटी स्टॅण्डवर खून झाला. १० जून रोजी मध्यरात्री तीनच्या सुमारास ही घटना घडली. या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना उद्या (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. कुणाल किसन कांबळे (वय २१, रा. रमाबाई आंबेडकर नगर, न्यु बुधवार पेठ) व अमन सुधाकर जेटीथोर (वय २१, रा. आम्रपाली चौक, न्यु बुधवार पेठ) अशी त्या संशयितांची नावे आहेत. यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे.
मृत कृष्णप्रसाद व्ही हे साताऱ्यात डाय मेकर म्हणून कामास होते. सध्या ते सेवानिवृत्त झाल्याने गावीच राहायला होते. ‘पीएफ’चे काम असल्याने ते साताऱ्याला निघाले होते. हैदराबाद येथे सासरवाडीला राहून रात्री एसटी बसने सोलापूरमार्गे साताऱ्याला निघाले होते. पहाटे अडीचच्या सुमारास त्यांची बस सोलापूर स्थानकावर आली होती. बार्शीकडे जाणाऱ्या बसगाड्या ज्याठिकाणी थांबतात, तेथून ते लघुशंकेसाठी गेले. त्यावेळी तिघांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्या तिघांची कृष्णप्रसाद यांच्यासोबत झटापट झाली.
पैसे लुटण्याच्या उद्देशाने त्या तिघांनी कृष्णप्रसाद यांच्याशी झटापट केली. यात जमिनीवर जोरात आदळलेल्या कृष्णप्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला. बस स्थानकातील फलाट क्र. २२ जवळ ही घटना घडली होती. फौजदार चावडी पोलिसांनी त्यांना बेशुद्धावस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणात मयताची मुलगी प्रकृती कृष्णप्रसाद यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरुन तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत तपास करीत आहेत.
संशयित आधीच स्थानकात आले होते
मध्यरात्री दोनच्या सुमारास कुणाल, अमन व तो विधीसंघर्षग्रस्त मुलगा बस स्थानकात आले होते. फलाट क्र. २२ जवळ ते बसले होते. हैदराबादवरुन आलेल्या बसमधून कृष्णप्रसाद उतरले आणि लघुशंकेसाठी गेले. त्यांचा पाठलाग करीत तिघेही कृष्णप्रसाद यांच्या मागे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. कृष्णप्रसाद यांच्याकडील दोन-तीन हजार रुपयांसाठी त्या तिघांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. यातील कुणाल याच्यावर पूर्वीचा जबरीचा चोरीचा एक गुन्हा दाखल असून त्यात तो दोन महिने तुरंगात होता.
डोक्याला मागील बाजूला होती जखम
बेशुद्धावस्थेत पडलेल्या कृष्णप्रसाद व्ही यांना पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या डोक्याला मागील बाजूला जबर जखम झाली होती. स्वत:हून पडलेल्या व्यक्तीला इतकी गंभीर दुखापत होत नसल्याने डॉक्टरांनी संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला आणि खुनाचा प्रकार समोर आला. पोलिसांनी काही तासांतच संशयितांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.