निवडणूक आयोग देवदूत नाही : बाळा नांदगावकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

- मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली पत्रकार परिषद.

- या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर केली टीका.

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयापासून मागे जात असून, त्यांनी मनसेच्या विभागीय अध्यक्षांकडून संभाव्य उमेदवारांची नावे मागितली आहेत. निवडणूक लढविण्याबाबत पक्षातील कार्यकर्त्यांचा दबाव वाढल्याने, ठाकरे यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय ठाकरेच घेणार आहेत. 

मनसेने 2009 च्या निवडणुकीत जोरदार प्रवेश करीत तेरा जागा जिंकल्या. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढल्याने मनसेचा धुव्वा उडाला. त्यांचा एकच आमदार निवडून आला, तोही आता शिवसेनेत गेला आहे. अशी स्थिती असली तरी, राज ठाकरे यांचे एक वलय आहे. त्यांच्या भाषणामुळे तरुणाईत त्यांच्याविषयी आकर्षण आहे. 

लोकसभा निवडणूक प्रचारात मोदी-अमित शहा यांच्याविरुद्ध त्यांनी केलेल्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळाला होता. "लाव रे तो व्हिडिओ' असे म्हणत त्यांनी केलेल्या भांडाफोडीला लोकांचा प्रतिसाद मिळत होता. मतदान यंत्रांऐवजी मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे, अशी मागणी करीत त्यांनी निवडणुकीवर बहिष्काराची मागणी लावून धरली होती. दरम्यान, कार्यकर्त्यांचा आग्रह वाढल्याने त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. 

"नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर युतीचे काय?

विभागीय अध्यक्षांकडून संभाव्य उमेदवारांची नावे मागविली आहेत. निवडणूक लढविण्याचा निर्णय राज ठाकरे घेतील, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज स्पष्ट केले.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद या महानगरांबरोबरच ग्रामीण भागातील काही ठिकाणी ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे, मनसेचे इंजिन धावत असतानाच, "लाव रे तो व्हिडिओ' या पद्धतीच्या प्रचाराने राज्यातील प्रचाराचे वातावरण ढवळून निघणार आहे. 

बाळा नांदगावकर यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

- राज ठाकरे यांनी मत ऐकून घेतली

- विभाग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची मत जाणून घ्या असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

- कार्यकर्त्यांची निवडणूक लढवावी असा आग्रह आहे.

- सखोल निर्णय घेऊन अध्यक्ष निर्णय घेतील

- आमच्या पक्षाची सदैव 'एकला चलो रे' भूमिका होती

- निवडणूक तारखा बाहेर आल्यावर अनेक निर्णय होतील

- काही ठिकाणी बांधणी पक्षाची उत्तम आहे याचा आढावा घेतला

- चर्चेमध्ये मतांतर होतच असतात

- पक्ष प्रमुखांची भूमिका एव्हीएमविरोधात आहे

- निवडणूक लढवायची झाली तर बहुतांशी मतदारसंघ आम्ही लढू. तसेच काय करायचं काय नाही, याबाबत आमचा विचार सुरू आहे

- अमित ठाकरे हे रॅलीत जातातच त्यामुळे ते चेहरा असू शकतील की नाही हे साहेब ठरवतील

- निवडणूक आयोग हे देवदूत नाही- बाळा नांदगावकर

- ही लढाई ईव्हीएम जरी असला तरी आम्ही तयार आहोतच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission is not an angel says MNS Leader Bala Nandgaonkar Maharashtra Vidhan Sabha Election