भाजप नेत्याबरोबर सतेज पाटलांची बंद खोलीत चर्चा! राजकीय वर्तुळात खळबळ : Satej Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satej Patil

भाजप नेत्याबरोबर सतेज पाटलांची बंद खोलीत चर्चा! राजकीय वर्तुळात खळबळ

कुरुंदवाड (कोल्हापूर) : कोल्हापूर विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आज (ता. १४ नोव्हेंबर) कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, (Jayram Patil) माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील (Raosaheb Patil)आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे (Ramchandra Dange) यांची भेट घेतली. या वेळी डांगे यांच्याबरोबर त्यांनी बंद खोलीत चर्चा केली. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपच्या नगरसेवकांचीही पाटील यांनी भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली. विधान परिषदेसाठी कुरुंदवाड नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्यासह २० मतदार आहेत.

नगराध्यक्ष जयराम पाटील हे पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय असून कॉँग्रेसची ९ मते पक्की अ‍ाहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच, तर भाजपकडे सहा मते आहेत. सतेज पाटील यांनी आज सर्वप्रथम नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या निवासस्थांनी आले. तेथे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची भेट घेत चर्चा करून मतदानाचे आवाहन केले. भाजप नगरसेवकांचे कुटुंबीय तेथे उपस्थित होते. त्यानंतर ज्येष्ठ नेते रावसाहेब ऊर्फ दा. आ. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर भाजप नेते रामचंद्र डांगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत बंद खोलीत २० मिनिटे चर्चा केली. माजी नगराध्यक्ष डांगे यांनीही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गतनिवडणुकीत डांगे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असतानाही विधान परिषद निवडणुकीत महाडिक यांच्या बाजूने होते.

कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत सतेज पाटील यांनी कॉंग्रेससाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात पालकमंत्री यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली होती. मात्र, आज पाटील यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीसह भाजप नगरसेवकांच्या भेटी घेत सर्वांनाच धक्का दिला. या वेळी भाजपचे रामदास मधाळे, दयानंद मालवेकर, अजीम गोलंदाज, उदय डांगे, सुजाता डांगे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा: संजयकाका पुन्हा बाजी मारणार की आरआर आबांचा गट वचपा काढणार?

या भेटी दरम्यान गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंगेजखान पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय जयराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी आलासे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, शिरोळ तालुका शिवसेना प्रमुख वैभव उगळे, ज्येष्ठ नेते धनपाल आलासे, बाबासाहेब सावगावे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, पप्पू पाटील, सुनील गायकवाड, प्रवीण खबाले, अजित देसाई, रमेश भुजूगडे, अभिजीत पाटील, बंडू पाटील, बाबासो भबिरे, चंद्रकांत पवार, प्रवीण खबाले या मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top