निवडणुका पारदर्शकच व्हाव्यात : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

- आमचा कुणावरही अविश्वास नाही.

- निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत

मुंबई : महाराष्ट्राच्या निवडणुकांकडेही देशाचे वेगळे लक्ष असते. या निवडणुकांना सामोरे जात असताना लोकांच्या मनात इव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत शंका आहे. आमचा कुणावरही अविश्वास नाही. मात्र, निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. 

इव्हीएमविरोधात आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी इव्हीएमबाबत पक्षाच्या वतीने मत मांडले. मागील काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनीही अशाप्रकारची मागणी केली होती. अनेक प्रगत देशांमध्ये इव्हीएमच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, ही कुण्या एका राजकीय पक्षाची नव्हे! संपूर्ण जनतेची मागणी म्हणून ती पुढे यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

देशात अनेक ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. भाजपने जो अंदाज व्यक्त केला तसा निकाल लागला. अनेकांनी याबाबत इव्हीएम मशीनवर निवडणूक होऊ नये, अशी भूमिका व्यक्त केली. परंतु हे अमान्य करण्यात आले असेही अजित पवार म्हणाले. आता या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. यासाठी सगळेच पक्ष एकत्र आले आहेत, असेही ते म्हणाले. 

देशात पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजे. अशा व्यवस्थेवर सगळ्यांना शंका आहेत. त्यात हे लोक अंदाज व्यक्त करतात आणि तितक्या जागा येतात हे अजब आहे, असे आश्चर्य व्यक्त केले. आता देशात संभ्रमाचे वातावण निर्माण झाले आहे. त्यामुळे निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे, यासाठी अजित पवार यांनी जनतेला आवाहन केले.

राज ठाकरेंच्या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे : भुजबळ

अनेकांनी इव्हीएम मशीनवर होणाऱ्या निवडणुकांवर अविश्वास व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी हा लढा सुरू केला आहे. या लढ्यात सर्वांनी सामील व्हावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

अमेरिका, जपान यांनी हे तंत्रज्ञान फेकून दिले आहे. तरीदेखील आपल्याला हे का हवे आहे? असा सवालही छगन भुजबळ यांनी केला. निवडणुकीवर सगळ्यांचा विश्वास बसला पाहिजे, यासाठी सरकारला गदगदा हलवण्याची गरज आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections should be transparent says NCP Leader Ajit Pawar