राज्यातील १४,२३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार

.राजाभाऊ नगरकर.
Sunday, 22 November 2020

एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील १५६६ ग्रामपंचायती आणि जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीमधील १२, ६६७ अशा एकूण चौदा हजार २३३ ग्रामपंयती मुदत संपलेल्या,नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायती आहेत

जिंतूर (जिल्हा परभणी) - राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे या वर्षाअखेरीस राज्यातील मुदत संपलेल्या व नव्याने स्थापित झालेल्या चौदा हजार २३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार आहे.

एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील १५६६ ग्रामपंचायती आणि जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीमधील १२, ६६७ अशा एकूण चौदा हजार २३३ ग्रामपंयती मुदत संपलेल्या,नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायती आहेत. यापैकी एप्रिल ते जून मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम मार्च महिन्यात राबविण्यात येत असतानाच कोविड १९ या संसर्गजन्य आजाराची गंभीर परिस्थिती उद्भवली.त्यामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती.आता लॉकडाऊन शिथील झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने नव्याने निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

हेही वाचाकोरोना टेस्टचा रिपोर्ट नसलेल्या शिक्षकांबाबत मुख्याध्यापकांसमोर पेच

त्यानुषंगाने शुक्रवारी (ता.२०) राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी सदर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्राद्वारे  आदेशित केले आहे.त्यासाठी २५ नोव्हेंबर २०२० रोजी विधानसभेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

त्यानुसार एक डिसेंबर २०२० ला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर एक ते सात डिसेंबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. तर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दहा तारखेला प्रसिद्ध केल्या जातील.

वेगवेगळ्या विभागाचे प्रधान सचिव, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व सबंधित विभागांना सदरील आदेशाच्या प्रति पाठविण्यात आल्या आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elections will be held for 14,233 Gram Panchayats in the state parbhani news