ई सकाळ: एक ते महिन्याला एक कोटी...

eSakal becomes top choice of readers with 10 million audience per month
eSakal becomes top choice of readers with 10 million audience per month

26 जानेवारी 2000 ची मध्य रात्र. इंटरनेट एक्सप्लोअर उघडले आणि www.esakal.com असे टाईप करून क्लिक केले आणि हळूहळू ई सकाळ ची वेबसाईट उघडत गेली. ई सकाळ तेंव्हापासून जगभरातील वाचकांवर अधिराज्य गाजवत आहे. 28 एप्रिल 2020 रोजी ई सकाळने महिन्याला तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. पहिला वाचक ते एक कोटी पर्यंतचा टप्पा... ई सकाळसाठी अभिमानास्पद आहे. पण, हे केवळ वाचकांमुळे शक्य झाले आहे...

1990 च्या दशकात इंटरनेटची भारतात ओळख होऊ लागली होती. पण, अनेकांना इंटरनेट म्हणजे नेमके काय असते हेच समजत नव्हते. इंटरनेट हा शब्द ऐकला तरी कुतुहूल वाटायचे. त्या काळामध्ये मराठी दैनिकांच्या फारशा वेबसाईट नव्हत्या. 'सकाळ'ने काळाची आणि वाचकांची गरज ओळखून इंटरनेट आवृत्ती काढण्याचे ठरवले आणि ई सकाळचे काम सुरू झाले. सकाळच्या दोन कर्मचाऱयांवर बातम्यांची जबाबदारी होती. माहिती तंत्रज्ञान विभागाने यावर काम करून वेबसाईट तयार केली. त्याकाळी इंटरनेटचा स्पीड कासवाप्रमाणे. प्रथम सर्व बातम्या, लेख संगणकावर सेव्ह कराव्या लागत. सर्व काम झाले की सेव्ह केलेल्या सर्व फाईल एफटीपीच्या माध्यमातून सर्व्हरवर अपलोड केल्या जायच्या. पण, सर्व काही इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून असायचे. अनेकदा 4-5 केबीची फाईल अपलोड होण्यासाठी अर्धा-अर्धा तास लागे. यावरून इंटरनेटचा अंदाज बांधता येईल.

फॉण्ट डाऊनलोड..
दोन हजारच्या काळात आजच्या सारखा युनिकोड फॉण्ट डेव्हलप झालेला नव्हता. त्यामुळे ई सकाळ साईट उघडली तर शब्द कळत नव्हते. गार्बेज दिसायचे. यासाठी ई सकाळच्या मुख्य पानावर सर्वांत वरच्या बाजूला फॉण्ट डाऊनलोड असा ऑप्शन दिलेला असायचा. सकाळचा सुबक हा फॉण्ट वाचकाने आपल्या मशिनवर डाऊनलोड केल्यानंतरच साईट वाचायला मिळायची. ई सकाळचा फॉण्ट दिसत नाही म्हणून अनेकज कार्यालयात फोन करायचे. शंकाचे निरसण केल्यानंतर साईट वाचायला मिळायची.

लोकल ते ग्लोबल...
ई सकाळच्या सुरवातीच्या कळात वाचक हा मुख्यतः परदेशातील होता. परदेशातील नागरिकांना ई सकाळवरील बातम्या वाचायला मिळू लागल्यानंतर अनेकजण मेल, फोनवरून आभार मानत. कारण, तोपर्यंत परदेशातील नागरिकांना बातम्या वाचण्यासाठी दुसरे माध्यम उपलब्ध झालेले नव्हते. यामुळे 10 टक्के लोकल तर 90 टक्के परदेशातील वाचक, अशी आकडेवारी होती. दिवसेंदिवस इंटरनेटने क्रांती होत गेली आणि आकडेवारी बदलत गेली. सध्याच्या काळातही जगभरात पसरलेले मराठी वाचक आपापल्या वेळेत ई सकाळ वाचत असल्याचे गुगुल ऍनालिटिक्स वरून पाहायला मिळते.

स्टीकर ते सोशल मीडिया...
ई सकाळने वाचकांसाठी इंटरनेट आवृत्ती सुरू केली होती. पण, अनेकांना युआरएल काय आहे, हे समजायचे नव्हते. ई सकाळचा प्रसार होण्यासाठी www.esakal.com ची स्टिकर तयार करून ती दुचाकी, मोटारी अथवा सार्वजनिक ठिकाणी चिटकावली जात होती. शिवाय, 'दैनिक सकाळ'मधून जाहिरात केली जात होती. शिवाय, ई सकाळवर मतचाचणी घेऊन ती दैनिकामध्ये दिली जात असे. यामुळे अनेकजण मत नोंदविण्यासाठी ई सकाळवर येत. पण, 2020 मध्ये इंटरनेटची परिस्थिती पूर्णताः बदलली आहे. एका सेंकदात जगभर बातमी जाताना दिसते. त्याकाळी सोशल मीडिया फारसा रुळलेला नव्हता.

ऑर्कुट ते इन्स्टाग्राम...
सन 2000 च्या काळात सोशल मीडियासाठी ऑर्कुट नावाचे माध्यम होते. यामाध्यमावर वेगवेगळे प्रकारचे ग्रुप असायचे. त्या-त्या ग्रुपमधील ऍडमिनला प्रचंड महत्व असायचे. पण, ई सकाळ वाचकांसाठी प्रत्येक माध्यमावर आपले वर्चस्व टिकवून ठेवायचा. काळानुसार वेगवेगळी माध्यमे येत गेली आणि ई सकाळ परिस्थितीनुसार बदलत गेला. ऑर्कुटपासून ते फेसबुक, ट्विटर, युट्यूब, व्हॉटसऍप, इन्स्टाग्रामवर ई सकाळच्या लिंक शेअर होताना दिसू लागल्या. यामुळे सोशल मीडिया हे प्रसारासाठी मोठे माध्यम ठरले.

ऑडिओ ते व्हिडिओ...
ई सकाळ वाचकांची गरज ओळखून नेहमीच बदल करत गेले. सुरवातीच्या काळात फक्त बातम्या आणि लेख. दुसऱया टप्प्यात ऑडिओच्या माध्यमातून बातम्या. ई सकाळमधील सहकारी न्यूज बुलेटिन तयार करून ते अपलोड करत यामुळे वाचकांना बातम्या वाचण्याबरोबरच ऐकायलाही मिळू लागल्या. त्या पुढचा टप्पा म्हणजे व्हिडिओ न्यूज. व्हिडिओ न्यूजच्या माध्यमातून अनेक बातम्या तयार केल्या जात असून, त्या वाचकांना पाहायला मिळतात.

24 तासापूर्वी ते लाईव्ह...
ई सकाळच्या सुरवातीच्या काळामध्ये दैनिकामधील बातम्या रात्री ई सकाळवर अपलोड केल्या जात. यामुळे सकाळ आणि ई सकाळची आवृत्ती एकाचवेळी वाचकांना मिळायची. वाचकांना 24 तासांपूर्वीची बातमी मिळायची. पण, ती बातमी वाचल्यानंतरही अनेकांना आनंद होत असे. कारण, तत्काळ बातमी समजण्यासाठी दुसरे प्रभावी माध्यम नसायचे. शिवाय, इंटनरनेटचे जाळेही फारसे विस्तारलेले नव्हते. पण, हळूहळू परिस्थिती बदलत गेली आणि 24 तासांपूर्वीच्या बातमीने आता लाईव्हची जागा घेतली आहे.

संगणक ते मोबाईल...
सन 2000 च्या काळात ई सकाळ पाहण्याची सुविधा फक्त संगणकावरच उपलब्ध होती. कारण, दुसरे माध्यम उपलब्ध नव्हते. संगणक असला तरी इंटरनेट हवे. भारतात इंटरनेटचाही फारसा विस्तार झालेला नव्हता. यामुळे ज्यांच्याकडे इंटरनेट उपलब्ध आहे, त्या ठिकाणीच ई सकाळ वाचता येत असे. संगणकाची जागा लॅपटॉप, आयपॅड, नोटने घेतली आणि ई सकाळ बंद खोलीतून सार्वजनिक ठिकाणी दिसू लागला. माहिती तंत्रज्ञानातील प्रचंड बदलामुळे क्रांती होत गेली आणि ई सकाळने प्रत्येकाच्या हातात स्थान मिळवले ते म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून.

ई सकाळच्या माध्यमातून जगभरातील वाचकांना आज बातम्या तर वाचायला मिळतात पण व्हिडिओही पाहायला मिळतात. सुरवातीच्या काळात निवडक बातम्यांची जागा आता घराशेजारील बातम्यांनी घेतली आहे. शिवाय, ई पेपरच्या माध्यमातूनही वाचकांना सकाळ वाचायला मिळतो. जगभरातील वाचक प्रतिक्रिया, ई मेलच्या माध्यमातून सकाळचे आभार मानात आहेत. जगभरातील अनेक वाचक पुण्यात आल्यानंतर आभार मानण्यासाठी सकाळ कार्यालयात आवर्जून भेट देतात. ई सकाळ गेल्या 20-21 वर्षांत वाचकांच्या पंसतीनुसार बदल करत गेला आणि सामाजिक बांधिलकी जपत मराठी वाचकांसाठी सतत काही ना काही देत गेला. पण, ई सकाळवरील वाचकांचे प्रेम प्रतिक्रिया, ई मेलच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

सातासमुद्रापार गेलेल्या वाचकांसाठी ई सकाळ म्हणजे एक अप्रुप गोष्ट होती. पण, आता ई सकाळ आता मराठी वाचकांवर अधिराज्य गाजवत आहे. यामुळे तर महिन्याला एक कोटीचा टप्पा पार केला गेलाय. हे केवळ वाचकांमुळेच शक्य झाले आहे. ई सकाळचा पहिला वाचक ते एक कोटी टप्प्याचे अनेक साक्षीदार आजही आहेत. वाचकांच्या प्रेमामुळेच ई सकाळची वाटचाल दिवसेंदिवस वाढत आहे.
वाचकहो, धन्यवाद!!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com