

solapur ; भोजप्पा तांडा परिसरातील हातभट्टीवर छापेमारी
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री, वाहतूक, हातभट्ट्यांवर छापेमारी सुरु केली आहे. २३ ते २६ डिसेंबरपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तब्बल २९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक जे. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए. व्ही. घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक राम निंबाळकर, धनाजी पोवार, सुखदेव सिद, सचिन शिंदे, समाधान शेळके, सुदर्शन संकपाळ, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण यांच्या नेतृत्वातील पथकांनी ही कारवाई केली. या कारवाईत पथकांनी ४२ गुन्हे दाखल करीत ५० जणांवर कारवाई केली आहे.
यात २८ हजार २९० लिटर गुळमिश्रित रसायन, १४३४ लिटर हातभट्टी, १७५ लिटर देशी व १८ लिटर विदेशी दारु, ११ लिटर बिअर, ७५ लिटर ताडी जप्त केली आहे. ज्या नागरिकांना अवैध हातभट्टी, देशी-विदेशी दारु विक्री, वाहतुकीची माहिती असेल, त्यांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सॲपवर कळवावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.
मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेलही टार्गेट
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी सात ढाब्यांवर कलम ६८ व ८४ नुसार कारवाई करुन २७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यात हॉटेल जगदंबा, हॉटेल यशराज ढाबा, हॉटेल राजवाडा ढाबा, विलास कोल्ड्रिंक्स, विजयपूर रोड परिसरातील चायनिज सेंटर, हॉटेल वैष्णवी ढाबा यांचा समावेश आहे. विनापरवाना मद्यविक्री व मद्यपानाची सोय केल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे. संबंधितांवर २५ ते ३० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. मद्यपान करणाऱ्यास ५०० ते ५००० रुपयांपर्यंत तर मद्यविक्री करणाऱ्या ढाबा चालकास ५ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
मुळेगाव तांड्यावर सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील हातभट्ट्यांवर छापे टाकले. त्यात तीन हातभट्ट्यांवरील १४ हजार ६०० लिटर गूळमिश्रित रसायन नष्ट केले. यातील तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाया सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध दारू निर्मिती करून त्याची ग्रामीण भागात वाहतूक होते. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वातील पथकांनी मुळेगाव तांड्यावर छापे टाकले. कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके तयार करण्यात आली होती. स्वत: वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वातील पथकाने मुळेगाव तांड्यावरील हातभट्टी चालकांवर कारवाई केली. त्यावेळी हातभट्टी दारू निर्मितीसाठी लागणारे ७३ बॅरेलमधील गूळमिश्रित रसायन जागीच नष्ट करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.