अपेक्षा... मराठी माणसांच्या जिव्हाळ्याच्या "नाट्य चळवळी'चा पडदा पुन्हा उघडण्याची ! 

प्रकाश सनपूरकर 
Tuesday, 28 July 2020

सुप्रसिद्ध नाट्य कलावंत, "हास्यसम्राट' दीपक देशपांडे म्हणाले, कोरोना संसर्गामुळे लोक घरात बसून टीव्ही व मोबाईलच्या अतिवापराने कंटाळले आहेत. लोकांना आता पूर्वीसारख्या सामान्य जीवनाची ओढ लागली आहे. तसेच मोबाईल व टीव्हीच्या तुलनेत सजीव माध्यम म्हणून नाटक ओळखले जाते. पुन्हा एकदा ही चळवळ सुरू होण्यासाठी लोकांच्या मनातून एकत्र येण्याची भीती देखील जायला हवी. या क्षेत्रात व्यावसायिक, प्रायोगिक व समांतर नाटक अशा सर्वच प्रकारांमध्ये काम करणाऱ्या संस्था व संघटनांनी एकत्रित प्रयत्न करून सादरीकरणासाठी हवे असलेले योग्य वातावरण निर्माण करावे. शासनाशी समन्वय साधून ही कोंडी संपवण्याची गरज आहे. येत्या काळात ही सकारात्मक गोष्ट घडून येईल, ही अपेक्षा आहे. 

सोलापूर : मराठी माणसाच्या जीवनाशी अतूट नाते असलेल्या नाट्य चळवळीचा रंगमंच पुन्हा कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा नाट्यकर्मी व रसिकांना आहे. हजारो लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार देऊन त्यांचे अर्थकारण चालवणारी ही चळवळ आहे. कोरोना संकटाच्या तणावातून रसिकांना मुक्त करण्यासाठी नव्या जोमाने योगदान देण्यास तयार आहे. लॉकडाउनचा कालावधी संपत आला असून नव्या परिस्थितीत शासनाच्या नव्या नियमावलीची प्रतीक्षा नाट्यकर्मींना आहे. 

हेही वाचा : अनुकरणीय : तरुण शेतकऱ्याचा सोशल मीडियाद्वारे मार्केटिंग फंडा; थेट पेरू विक्रीतून मिळवतोय दोन लाख रुपये! 

मागील काही महिन्यांपासून कोरोना संकटामुळे अनेक क्षेत्रांना जोरदार धक्का बसला. त्यामध्ये नाट्य चळवळीची मोठी हानी झाली. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नाट्यगृहे बंद झाली. प्रवासी वाहतूक बंद झाल्याने नाट्य कलावंतांचा नाटकांसाठी होणारा प्रवास बंद झाला. स्थानिक कलावंतांचे सादरीकरण थांबले. नाट्य व्यवस्थापकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या नाटकांच्या बुकिग व गुंतवलेली रक्कम देखील पालिका व महापालिकांकडे अडकून पडली. या चळवळीत नाटकात काम करणाऱ्या कलावंतांसोबतच पडद्यामागचे नेपथ्यकर्मी, तंत्रकर्मी, बुकिंग क्‍लर्क, कॅंटीन व्यावसायिक, लॉज मालक, नाट्यगृहाचे कर्मचारी अशा कितीतरी व्यक्तींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार जोडलेला आहे. महापालिकांना देखील या नाटकांच्याद्वारे नाट्यगृह भाड्याचा महसूल मिळतो. त्यामुळे या सर्व घटकांच्या अर्थकारणाची साखळीच विस्कळित झाली. राज्यातील अनेक शहरांत पोचलेली नाट्य चळवळ ही या पद्धतीने लोकजीवनाशी जोडलेली आहे. 

हेही वाचा : राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना नाराज; "या' जिल्ह्यातील नेत्यांची पक्षप्रमुखांकडे धाव! 

नाट्यगृहात देखील एसटी व रेल्वेप्रमाणे सोशल डिस्टन्स ठेवून रसिकांची आसनव्यवस्था करता येऊ शकेल. नाट्य चळवळीसाठी पालिका व महानगरपालिकांनी शासनाच्या नियमांच्या अधीन राहून परवानगी देणे व कलांवतांना बाहेर गावावरून येण्यासाठी परवानगी या गोष्टी अत्यावश्‍यक असणार आहेत. कोरोना संकटात नागरिकांवर सर्वांत मोठा मानसिक धास्तीचा परिणाम झाला आहे. या मानसिक आघातामधून बाहेर पडण्यासाठी नाट्य चळवळ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ताणतणावाच्या बाहेर आणण्यासाठी या बाबीची गरज मोठ्या प्रमाणात आहे. 

कोरोना रुग्णांसाठी संगीताचे कार्यक्रम 
शहरात एका कोव्हिड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची मानसिक स्थिती चांगली असावी, यासाठी संगीताचे कार्यक्रम आयोजित केले गेले. त्याचा कोरोना रुग्णांनी सोशल डिस्टन्सचा नियम पाळून आनंद घेतला. यामध्ये सादरकर्त्यांनी सर्व काळजी घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम सुरक्षित पद्धतीने केले जाऊ शकतात, ही बाब समोर आली. कोरोना रुग्णांच्या मनातील कोरोनाचा तणाव जाण्यासाठी हा प्रयोग केला गेला. रुग्णांच्या उपचारासाठी संगीत कार्यक्रमाचा वापर होत असेल तर सर्वसामान्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी हे कार्यक्रम उपयोगी ठरू शकतात. 

राज्यभरातून नाट्यकर्मींचे प्रयत्न 
राज्य नाट्य व्यवस्थापन समितीचे सदस्य गुरू वठारे म्हणाले, नाट्य चळवळ पुन्हा सुरू व्हावी यासाठी चळवळीत जोडलेल्या रंगकर्मींचे प्रयत्न आहेत. राज्यभरातील या क्षेत्रातील मंडळी सातत्याने शासनाच्या संपर्कात आहेत. कोरोनाच्या मानसिक ताणातून लोकांना मुक्त करण्यासाठी ही चळवळ मोठे योगदान देऊ शकते. याबाबत येत्या काळात शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. 

लोकांना तणावमुक्तीसाठी कलात्मक कार्यक्रम हवेत 
सुप्रसिद्ध नाट्य कलावंत, "हास्यसम्राट' दीपक देशपांडे म्हणाले, कोरोना संसर्गामुळे लोक घरात बसून टीव्ही व मोबाईलच्या अतिवापराने कंटाळले आहेत. लोकांना आता पूर्वीसारख्या सामान्य जीवनाची ओढ लागली आहे. तसेच मोबाईल व टीव्हीच्या तुलनेत सजीव माध्यम म्हणून नाटक ओळखले जाते. पुन्हा एकदा ही चळवळ सुरू होण्यासाठी लोकांच्या मनातून एकत्र येण्याची भीती देखील जायला हवी. या क्षेत्रात व्यावसायिक, प्रायोगिक व समांतर नाटक अशा सर्वच प्रकारांमध्ये काम करणाऱ्या संस्था व संघटनांनी एकत्रित प्रयत्न करून सादरीकरणासाठी हवे असलेले योग्य वातावरण निर्माण करावे. शासनाशी समन्वय साधून ही कोंडी संपवण्याची गरज आहे. येत्या काळात ही सकारात्मक गोष्ट घडून येईल, ही अपेक्षा आहे. 

नियमाच्या आधारे परफॉर्मीग आर्टसचे सादरीकरण 
रंग संवादच्या संस्थापिका मीरा शेंडगे म्हणाल्या, परफॉर्मिंग आर्टस ही माणसाच्या जीवनाशी जोडलेली जिवंत कला आहे. आता पुढील काळात कोरोनासोबत राहण्याची शैली स्वीकारावीच लागणार आहे. मग ही शैली स्वीकारून नाट्य चळवळ देखील सुरू केली जाऊ शकते. काही शहरांत खुल्या नाट्यगृहात कार्यक्रम सादर केले जातात. तेथे लोकांना अगदी मैदानात स्वतःच्या गाडीत बसून कार्यक्रमाचा आनंद घेता येतो. बंदिस्त नाट्यगृहासोबत हे पर्याय देखील उपयोगात आणले पाहिजेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Expect to re-open the curtain of the intimate "drama movement" of Marathi people!