esakal | राज्यात 'या' दिवसापासून सुरू होईल तिसरी लाट! गणेशोत्सवापूर्वीच निर्बंधांचे विघ्न
sakal

बोलून बातमी शोधा

 Corona

राज्यात 20 सप्टेंबर ते 30 ऑक्‍टोबर या कालावधीत कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज टास्क फोर्स व आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तविला आहे.

राज्यात 'या' दिवसापासून सुरू होईल कोरोनाची तिसरी लाट !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) राज्यभरात गर्दी वाढण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. दुसरीकडे, राज्यात 20 सप्टेंबर ते 30 ऑक्‍टोबर या कालावधीत कोरोनाची (Covid-19) तिसरी लाट (Third Wave of Corona) येईल, असा अंदाज टास्क फोर्स (Task Force) व आपत्ती व्यवस्थापन विभागाने (Disaster Management Department) वर्तविला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात गणेशोत्सवापूर्वी निर्बंध पुन्हा कडक केले जाणार आहेत. त्यासंदर्भात गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) व मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. पुढील आठवड्यात टास्क फोर्स बैठक होणार असून, त्यानंतर 10 सप्टेंबरपूर्वीच निर्बंध कडक (Lockdown) करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

हेही वाचा: सकल मराठा समाजाकडून मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निषेध

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यात तिसरी लाट 40 दिवसांची असेल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यांमधील ग्रामीणमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. राज्यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या काळात प्रत्येक ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते. गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, अशी भीती आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी राज्यातील निर्बंध पुन्हा कडक केले जाणार आहेत. सद्य:स्थितीत मास्क न घालता बेशिस्तपणे फिरणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. विशेषत: ग्रामीणमध्ये नियमांचे पालन होताना दिसत नाही. शहरातील बाजारपेठांमध्येही गर्दी वाढली असून त्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपवून लावण्यासाठी सरकारकडून ऑक्‍सिजन निमिर्ती, सावठण क्षमता वाढविली आहे. तसेच रुग्णालयांमध्येही खाटांची व्यवस्था केली असून त्या ठिकाणी बालकांसाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.

हेही वाचा: शाळा बंदमुळे दुष्टच्रकात भावी पिढी! दोन लाख विद्यार्थी प्रवाहाबाहेर

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी होते. गर्दीतून कोरोना वाढू नये म्हणून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेऊन सार्वजनिक आरोग्य विभाग निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेऊ शकते. 20 सप्टेंबर ते 30 ऑक्‍टोबर या काळात कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे.

- श्रीरंग घोलप, अप्पर सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मुंबई

निर्बंधाची संभाव्य स्थिती...

  • अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य दुकाने रात्री आठनंतर राहतील बंद

  • हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी नकोच; पार्सल सेवेला राहणार प्राधान्य

  • शनिवार, रविवारी राहणार कडक संचारबंदी; अत्यावश्‍यक सेवेचीच दुकाने राहणार सुरू

  • सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर 50 टक्‍क्‍यांचे निर्बंध; प्रवाशांनी लसीकरण करून घ्यावे

  • पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्रित फिरणाऱ्यास बंदी; संचारबंदी लागू राहणार

  • रुग्णांची स्थिती पाहून संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेतील आणखी कडक निर्बंधाचा निर्णय

loading image
go to top