Loksabha 2019 : अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण

महेश गायकवाड
शनिवार, 20 एप्रिल 2019

जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ  शनिवारी (ता.20) भोकरदन शहरात जाहीर सभा झाली. त्यानंतर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्त्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली. ​

जालना -  पक्षाविरोधात काम केल्यामुळे अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी  करण्यात आली असून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बाबतीतही लवकरच निर्णय होईल, अशी  घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे केली.

जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ  शनिवारी (ता.20) भोकरदन शहरात जाहीर सभा झाली. त्यानंतर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्त्तरे देताना त्यांनी ही माहिती दिली. सभेत ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात काहीजणांनी पक्षाविरोधात भानगडी केल्या. जालना व औरंगाबाद मतदारसंघाची उमेदवारी ठरवताना सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात आला. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  अब्दुल सत्तारांनी त्यास विरोध केला. त्यानंतरही  पक्षांनी त्यांना उमदेवारी देण्याची तयारी दर्शविली. मात्र,  ते औरंगाबदमधूनही उभे रहिले नाही. उलट दोन्ही ठिकाणी  वेगळी भुमीका  घेतली. पक्षात असे चालणार नाही. 

यावेळी आमदार राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, उमेवार विलास औताडे, भिमराव डोंगरे, राजाभाऊ देशमुख, यांच्यासह काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या   पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आरोप चुकीचे असून, मी निवडणूकीत 100 कोटी खर्च केले असतील आणि माझ्या सासूच्या नावावर 4 फ्लॅट असतील तर त्याची चौकशी करा असेही चव्हाण म्हणाले. काल प्रकाश आंबेडकर यांनी चव्हाण यांच्यावर लोकसभा निवडणुकीत 100 कोटी रुपये वाटल्याचा आरोप केला होता. त्यावर चव्हाण यांनी उत्तर दिले. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहे का असा सवाल देखील चव्हाण यांनी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The expulsion of MLA Abdul Sattar from Congress says Ashok Chavan