भाजप आमदारांमध्येच गटबाजी! देशमुख समर्थक शहराध्यक्ष काळेंना कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदलले; मंत्र्यांच्या दौऱ्यात आमदार पुढे अन्‌ पदाधिकारी मागच्या रांगेत

केंद्रीय असो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्यांचे किंवा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दौरा विमानतळावर किंवा त्यांच्या बैठकांमध्ये आमदारच पुढे पुढे करतात. त्या ठिकाणी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष खूपच मागच्या बाजूला दिसतात.
bjp solapur
bjp solapursakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी असल्याचे नेते सांगतात. पण, नुकत्याच झालेल्या सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदारांमध्येच काँग्रेस नेत्यांसमवेत निवडणूक लढण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांची गोची झाली. यात युवा आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांची साथ होती. त्यानंतर कार्यकर्त्यातून पुढे आलेले तत्कालीन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा कार्यकाळ संपलेला नसतानाच त्यांना बदलण्यात आले. अशा बाबींमुळे पक्षाअंतर्गत नाराजी वाढत आहे. पालकमंत्री भाजपचे, जिल्ह्यात सहा आमदार भाजपचे, तरीदेखील खऱ्या कार्यकर्त्यांना किंमत मिळत नसल्याची खंत अनेकजण खासगीत बोलून दाखवत आहेत.

लोकसभा, विधानसभा निवडणुकांमधील व्यस्ततेमुळे तत्कालीन शहराध्यक्ष काळे यांना पक्ष संघटनेसाठी फार वेळ देता आला नाही. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षेच झाला होता, त्यामुळे पक्षाकडून आपल्याला पुन्हा संधी मिळेल असा त्यांना विश्वास होता. सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह पक्षाचे अन्य आमदारही आपल्याच नावाची शिफारस करतील असा त्यांना विश्वास होता. मात्र, प्रदेश पातळीवरून शहराध्यक्ष बदलण्यात आला. आमदारांमध्ये नसलेली एकी, पक्षाअंतर्गत गटबाजीमुळे असे झाले असावे, असा तर्क अनेकांनी काढला. कारण, आपली मागणी नसतानाही पक्षाने मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली, नरेंद्र काळे यांना पुन्हा संधी मिळायला हवी होती, तसा आमचाही आग्रह होता, असे खुद्द नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितले.

मंत्र्यांच्या दौऱ्यात आमदारच पुढे तर पदाधिकारी मागच्या रांगेत

केंद्रीय असो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्यांचे किंवा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दौरा विमानतळावर किंवा त्यांच्या बैठकांमध्ये आमदारच पुढे पुढे करतात. त्या ठिकाणी शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष खूपच मागच्या बाजूला दिसतात. त्यामुळे ते पदाधिकारी ज्यावेळी संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात जातात, त्यावेळी कार्यकर्त्यांकडूनही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशी अनेकांची खंत आहे.

कोणत्या गटासोबत राहायचे हाच कळीचा प्रश्न

जिल्ह्यात सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर-मंगळवेढा या पाच मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील हेही भाजपचेच आमदार आहेत. या सर्वांमध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांच्या तालमीत तयार झाल्याचे उघडपणे सांगणारे आमदार कल्याणशेट्टी हे आपल्या कार्यशैलीने वेगाने पुढे येताना दिसत आहेत. त्यामुळे पूर्वी दोन दिशेने तोंड असणारे आमदारद्वय देशमुख आता एकत्र आले आहेत. अशा स्थितीत आपण कोणत्या गटासोबत राहायचे, हा प्रश्न अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासाठी कळीचा बनू लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com