खुशखबर! शेतकऱ्यांना येणार आता 'अच्छे दिन'

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 25 जून 2019

- शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात येणार निर्णय.

- राज्य सरकार लवकरच नवी घोषणा करण्याची शक्यता.

मुंबई : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक 36 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पावरील चर्चा मंगळवारी संपली. त्यानंतर या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी फडणवीस यांनी रणनीती आखली आहे. ते ऑगस्ट महिन्यात राज्यव्यापी विकास यात्रा काढणार आहेत. त्यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार ही मोठी घोषणा करू शकते. 

यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना 58 हजार 244 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे टार्गेट असून, बॅंकांना कसलेही आढेवेढे न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागेल. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीस यांनी "एसएलबीसी'च्या बैठकीत दिला आहे. त्यामुळे पीक कर्जाची आवश्‍यकता असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हमखास कर्ज मिळेल, असे मुनगंटीवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fadnavis Government May take Good Decision for Farmers says Sudhir Mungantiwar