esakal | मुख्यमंत्री आज दिल्ली दरबारी; शरद पवारही सोनियांशी चर्चा करणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Fadnavis likely to meet Shah in Delhi tomorrow and sharad pawar likely to meet sonia gandhi in delhi

शिवसेनेकडे 175 आमदारांचे संख्याबळ असून, मुंबईतील शिवतीर्थावर आमचाच मुख्यमंत्री शपथ घेईल. 
संजय राऊत, नेते शिवसेना 

मुख्यमंत्री आज दिल्ली दरबारी; शरद पवारही सोनियांशी चर्चा करणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भाजप- शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच आहे, आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही चर्चा अर्धवट सोडत बळिराजाच्या बांधावर धाव घेत त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपत्तिग्रस्त भागांना भेट दिली. अन्य मंत्र्यांनीही तोच कित्ता गिरवला मुख्यमंत्री फडणवीस हे आज (ता. 4) रोजी दिल्लीला जाणार असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उद्याच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतील. यामुळे आता या सत्तेच्या पेचप्रसंगात थेट पंतप्रधान मोदी किंवा भाजपचे अध्यक्ष अमित शहा हस्तक्षेप करून कोणता तोडगा काढू शकतात, याकडे सर्वांचेच लक्ष दिल्लीकडे लागले आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अकोल्यातील, तर उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील आपत्तिग्रस्त भागांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. दोन्ही नेत्यांनी सत्तास्थापनेच्या अनुषंगाने थेट भाष्य करणे टाळले. उद्धव यांनी शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली. "शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या टर्ममध्ये फक्त शिवसेना सत्तेत असेल का?' या प्रश्‍नावर उद्धव ठाकरे म्हणाले, ""ते तुम्हाला येणाऱ्या काळात कळेल. सध्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे एवढेच मला कळते.'' सरकार स्थापनेच्या निर्णयापर्यंत तुम्ही आल्याचे समजते, असे विचारले असता ते म्हणाले, ""आपण माणुसकीला धरून बोलूया, शेतकरी जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर असताना आपण सत्तास्थापनेच्या स्वप्नात राहणे योग्य नाही. परतीचा पाऊसदेखील मी पुन्हा येईन असे म्हणतो आहे; पण तो शेतकऱ्यांना नको असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला. अकोल्यात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनीही लवकरच सर्वांच्या हिताचे सरकार स्थापन करू, असा विश्‍वास व्यक्त केला. अतिवृष्टीने बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सध्या शेतकरी अडचणीत आहे. हंगामी सरकारला निर्णय घेताना काही मर्यादा असतात. त्यामुळे लवकरात लवकर सत्ता स्थापन होणे गरजेचे आहे. सत्ता स्थापनेचा तिढा सोडवून सर्वांच्या हिताचे सरकार लवकरच स्थापन करू, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला, शिवसेनेबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले. दरम्यान, फडणवीस हे उद्या राज्यातील दुष्काळी स्थितीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार असून, तेथे राज्यातील सत्तापेचाबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करण्याची शक्‍यता आहे. 

शिवसेनेकडे 175 आमदारांचे संख्याबळ असून, मुंबईतील शिवतीर्थावर आमचाच मुख्यमंत्री शपथ घेईल. 
संजय राऊत, नेते शिवसेना 

शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळायला हवी, पाऊसदेखील मी पुन्हा परत येईन असे म्हणतो आहे, 
पण शेतकऱ्यांना मात्र नको आहे. 
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख 

काळजीवाहू सरकार म्हणून जे निर्णय घेणे शक्‍य आहेत ते आम्ही घेत आहोत, पण या सरकारलाही शेवटी मर्यादा असल्याने नवे सरकार 
लवकर स्थापन होणे गरजेचे आहे. 
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

loading image