'या' जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी! पालकमंत्री राष्ट्रवादीचा अन्‌ नाराजी शिवसेना, कॉंग्रेसची

तात्या लांडगे
Saturday, 1 August 2020

पालकमंत्र्यांना शहराध्यक्षांचे नावही माहिती नाही 
भाजपला डावलून राज्यात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर आमदारकीची हॅट्रीक केलेल्या प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री पद मिळेल, अशी आशा होती. मात्र, राष्ट्रवादीने सोलापूर शहर-जिल्ह्यातील वर्चस्व कायम राखण्याच्या हेतूने पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांना कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांचे नावही माहिती नसल्याची टीका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली आहे. जनतेच्या प्रश्‍नांसंबंधी त्यांना अनेकदा फोन केला, मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, असेही ते म्हणाले.

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले दत्तात्रय भरणे यांना खूपवेळा फोन केला. मात्र, त्यांनी कधीच फोन घेतला नाही, ना कधी बैठकीसाठी शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बोलावले. पक्षाच्या तथा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित बैठकांमध्ये बोलवावे, असा आमचा आग्रह नसून कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या हेतूने आयोजित बैठकीसाठी नगरसेवकांना बोलावयला हवे होते. मात्र, पालकमंत्र्यांनी तसे काहीच केले नसल्याचेही वाले म्हणाले. 

कॉंग्रेस नेते तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे सोलापुरात आल्यानंतर त्यांनी स्वत:हून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना बोलावण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार भारत जाधव आणि पुरुषोत्तम बरडे यांना निरोप देण्यात आला. मात्र, त्या दोघांनीही त्या बैठकीला काही कारणे सांगत दांडी मारली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आतापर्यंत एकदाही कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना बैठकांसाठी बोलावले नाही. वास्तविक पाहता शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या नगरसेवकांना बोलावयला हवे होते. राज्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने शिवसेना नेत्यांनीही बैठकीसाठी बोलावले नसल्याने नाराजी व्यक्‍त केली आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांनीही पालकमंत्री फोन उचलत नसल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली होती. एरव्ही एकमेकांविरुध्द विविध विषयांवरुन आंदोलनाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे सूत जुळले नसल्याचे चित्र सोलापुरात पहायला मिळत आहे.
 
शिवसेना जिल्हाप्रमुख बरडे म्हणाले... 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे शहर-जिल्ह्यातील कोरोनासह अन्य विषयांवर चर्चा, नियोजन करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आम्हाला बैठकीसाठी बोलवायला हवे. मात्र, तसे कधी झाले नसून याबाबत पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राद्वारे कळविले आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख सोलापुरात आल्यानंतर कॉंग्रेस शहराध्यक्षांनी बैठकीसाठी मला निरोप दिला होता. परंतु, लॉकडाउन असल्याने मला जाता आले नाही, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
 
पालकमंत्र्यांना शहराध्यक्षांचे नावही माहिती नाही 
भाजपला डावलून राज्यात महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर आमदारकीची हॅट्रीक केलेल्या प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री पद मिळेल, अशी आशा होती. मात्र, राष्ट्रवादीने सोलापूर शहर-जिल्ह्यातील वर्चस्व कायम राखण्याच्या हेतूने पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांना कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांचे नावही माहिती नसल्याची टीका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी केली आहे. जनतेच्या प्रश्‍नांसंबंधी त्यांना अनेकदा फोन केला, मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, असेही ते म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Failure to lead Mahavikas Guardian Minister is angry with NCP and Shiv Sena, Congress