esakal | कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 'डीबीटी'द्वारे मिळणार 50 हजार! जाणून घ्या मदतीचे निकष
sakal

बोलून बातमी शोधा

Money

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 'डीबीटी'द्वारे मिळणार 50 हजार

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबियांना (वारसदार) प्रत्येकी 50 हजारांची मदत 'डीबीटी'द्वारे वितरीत केली जाणार आहे. त्यासंबंधीचे निकष व नियमावली बनविण्याचे काम मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने तयार केले जात आहेत. राज्यातील एक लाख 39 हजार 470 मृतांसाठी सहा हजार 973 कोटी रुपये लागणार असून ती संपूर्ण रक्‍कम गरीब कल्याण योजनेतून केंद्र सरकारकडून ऑक्‍टोबर अखेर मिळणार आहे. मदतीसाठी मृत्यू दाखला बंधनकारक असेल, असे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: ‘हर्ड इम्युनिटी’मुळे कोरोना नियंत्रणात

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना अर्ज केल्यानंतर महिन्यांत मदत देणे बंधनकारक असणार आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत आतापर्यंत (8 ऑक्‍टोबर) राज्यातील एक लाख 39 हजार 470 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा अव्वल असून मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्येही मृतांचे प्रमाण पाच हजारांहून अधिक आहेत. 50 हजारांच्या मदतीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाण्याची शक्‍यता आहे. अर्जासोबत त्याठिकाणी आवश्‍यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. संबंधितांनी अर्ज केल्यानंतर पुढील 30 दिवसांत मदत दिली जाणार आहे. तत्पूर्वी, ज्यांच्याकडे कोरोनामुळे मृत्यू झाल्याबद्दलचा पुरावा नाही, त्यासाठी 'डेथ ऑडीट'चा आधार घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.

हेही वाचा: कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत ५० टक्क्यांची वाढ

मिळण्याच्या अटी...

- कोरोना मृत्यू होण्यापूर्वी 30 दिवसांत संबंधिताने कोरोना टेस्ट केलेली असावी

- घरात अथवा अन्य ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांनाही मदत; पण, डेथ ऑडीटचा घेतला जाणार आधार

- मृत्यू दाखल्यात कोरोनाची नोंद नसेल, तरीही मृत्यू कोरोनामुळेच झाल्याचे सिध्द झाल्यास मिळणार मदत

- जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्स मदतीसंबंधीचा निर्णय घेतील

- कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपेपर्यंत योजना सुरु राहणार; मृत्यूनंतर अर्ज केल्यास नातेवाईकांना मिळेल मदत

हेही वाचा: विद्यार्थी शाळेत अन् शिक्षक कोरोना ड्यूटीवर!

म्युकरमायकोसिस मृतांना लाभ नाहीच?

राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 10 हजार 265 रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक हजार 376 रुग्णांचा मृत्यू झाला असून सोलापूर जिल्ह्यातील 101 रुग्णांचा त्यात समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना 50 हजारांची मदत मिळणार आहे, परंतु कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिस होऊन मृत्यू झालेल्यांचे काय, असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे. दुसरीकडे कोरोना झालेल्या काही रुग्णांचा मृत्यू डेंग्यूमुळेही झाला आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या मदतीचे काय, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला असून त्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

जिल्हानिहाय मृत्यू

पुणे (19,506), मुंबई (16,152), ठाणे (11,387), पालघर (3,278), रायगड (4,527), रत्नागिरी (2,444), सिंधुदुर्ग (1,415), सातारा (6,344), सांगली (5,598), कोल्हापूर (5,842), सोलापूर (5,496), नाशिक (8,342), नगर (6,933), जळगाव (2,712), नंदूरबार (947), धुळे (654), औरंगाबाद (4,250), जालना (1,209), लातूर (2,430), परभणी (1,230), हिंगोली (506), नांदेड (2,658), उस्मानाबाद (1,951), अमरावती (1,594), अकोला (1,423), वाशिम (637), बुलढाणा (792), यवतमाळ (1,798), नागपूर (9,128), वर्धा (1,217), भंडारा (1,123), गोंदिया (569), चंद्रपूर (1,559), गडचिरोली (669).

loading image
go to top