शेतकरी कर्जमाफीचा लाभ आजपासून; मुख्यमंत्री करणार यादी जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत, याची पूर्ण दक्षता घेतली असून, त्यामुळेच ही योजना टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत आहे. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 

मुंबई : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ आज (ता. २४)पासून मिळणार असून, पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील पात्र लाभार्थ्यांची यादी लावण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील गावांची यादी २८ फेब्रुवारीपासून लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. सह्याद्री अतिथिगृह येथे विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

कर्जमाफीची योजना राबविताना प्रत्यक्ष येणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्यात येतील आणि एप्रिल २०२० अखेरपर्यंत सर्व अंमलबजावणी व्हावी, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. सोमवारी ६८ गावांची यादी लावण्यात येईल आणि लाभही तात्काळ मिळतील, असे ठाकरे यांनी जाहीर केले. 

आतापर्यंत ३५ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचे आकडे समोर आले असून, त्या सर्व ३५ लाख शेतकऱ्यांची एप्रिलअखेरपर्यंत सरसकट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर तब्बल साठ महिने कर्जमाफीची योजना सुरू असल्याचा चिमटा काढत विद्यमान महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी मात्र केवळ तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल, अशी घोषणा ठाकरे यांनी या वेळी केली. 

महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत, याची पूर्ण दक्षता घेतली असून, त्यामुळेच ही योजना टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत आहे. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer loan waiver scheme starts today CM Uddhav Thackeray declared list