नाशिकच्या शेतकरी कंपनीला मिळाला पहिल्या खासगी बाजार समितीचा मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Government

राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना खासगी बाजार समित्यांची उभारणी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

नाशिकच्या शेतकरी कंपनीला मिळाला पहिल्या खासगी बाजार समितीचा मान

पुणे - राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना खासगी बाजार समित्यांची उभारणी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे आता शेतकरी उत्पादक कंपन्याही खासगी बाजार समित्यांची उभारणी करू शकतात. यानुसार देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनीची खासगी बाजार समितीची उभारणी करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीला मिळाला आहे. राज्याचे पणन संचालक सुनील पवार यांच्या हस्ते बुधवारी (ता.२) पुण्यात या कंपनीला खासगी बाजार समितीचा परवाना प्रदान करण्यात आला. सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांच्याकडे हा परवाना सुपूर्द करण्यात आला

प्रचलित व्यवस्थेनुसार उभारण्यात आलेल्या आणि सध्या कार्यान्वित असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील पारंपारिक कायदे आणि व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक आणि पिळवणूक टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पणनमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमध्ये खासगी बाजार समित्या उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांचा खासगी बाजार समिती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही सुनील पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

पणन संचालक सुनील पवार म्हणाले, ‘‘शेतमाल पणन व्यवस्था सुधारणांतर्गत शेतमाल विक्री व्यवस्थेतील बाजार समित्‍यांची एकाधिकारशाही कमी करण्यासाठी थेट पणन, एकल परवाना, खासगी बाजार समित्यांचे परवाने देण्याची सरकारची भूमिका आहे. या भूमिकेंतर्गत राज्यात आतापर्यंत ७३ खासगी बाजार समित्यांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र यामध्ये आतापर्यंत एकाची शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश नव्हता. खासगी बाजार समिती उभारण्यासाठी आतापर्यंत एकाही शेतकरी उत्पादक कंपनीने पुढाकार घेतला नव्हता. मात्र यासाठी मोहाडीच्या (जि.नाशिक) सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीने अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना आज परवाना दिला आहे. यामुळे ‘सह्याद्री’ ही खासगी बाजार समिती उभारणारी देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे.’’

सह्याद्री कंपनी द्राक्षे, टोमॅटोमध्ये कंत्राटी शेतीबरोबरच, उत्पादनापासून ते प्रक्रिया आणि निर्यातीमध्ये काम करत आहे. मात्र यामध्ये बाजार समिती म्हणून आम्ही कमी होतो. ती कसर आता भरून निघाली आहे. या खासगी बाजार समितीच्या माध्यमातून कंपनीच्या सभासदांबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांना पारंपारिक बाजार समितीला पर्याय मिळावा. जेणेकरून त्यांना स्पर्धात्मक दर मिळावा, या उद्देशाने आम्ही ही बाजार समिती उभारली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी.