

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : ई-केवायसी नसणे, नावात बदल किंवा त्रुटी, बॅंक खात्याचा तपशील चुकीचा असल्याने चार लाख १५ हजार शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टी व महापुराची भरपाई मिळालेली नाही. त्या शेतकऱ्यांना उद्यापासून (गुरूवार) ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देखील वेगवेगळ्या भागात विशेष कॅम्प राबविले जाणार आहेत.
अतिवृष्टी व सीना नदीच्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील सात लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांना भरपाईपोटी केंद्र व राज्य सरकारने ८६७ कोटी ३७ लाख रुपयांची मदत दिली. तर रब्बीच्या मशागत व बियाणांसाठी ६५२ कोटी रुपये दिले. परंतु, अजूनही ६० टक्के शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेतच आहेत. पूर्वी आधारलिंक खात्यात मदत जमा होत होती. परंतु, आता मदतीसाठी फार्मर आयडीचे बंधन घातले. अनेकांनी नव्याने फार्मर आयडी काढले तर काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नव्हती. त्यामुळे त्यांना मदत मिळू शकली नाही.
नुकसान भरपाईची यादी प्रशासनाने ऑनलाईन अपलोड केल्यावर प्रत्येक बाधित शेतकऱ्यांना मंडलनिहाय ‘व्हीके’ क्रमांक येतो. त्या क्रमांकावरून आपले सरकार सेवा केंद्रातून (सीएससी) ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. तशी प्रक्रिया न केल्याने अनेकांना भरपाईची रक्कम मिळू शकलेली नाही. त्यामुळे १३ ते २० नोव्हेंबरपर्यंत ‘ई-केवायसी’चे पोर्टल सुरू केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी जवळील आपले सरकार सेवा केंद्रातून ई-केवायसी करून घ्यावी, जेणेकरून त्यांची अडकलेली भरपाई बॅंक खात्यात जमा होईल.
अकराशे कोटी रुपये अडकले
अतिवृष्टी व पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील सात लाख ६४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची पिके वाया गेली. त्यांच्यासाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी साडेआठ हजार, बागायतीसाठी १७ हजार ५०० आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार ५०० रुपयांची भरपाई दिली. सप्टेंबर महिन्यातील भरपाईपोटी जिल्ह्याला ८६७ कोटी ३७ लाख रुपयांची मदत मिळाली. याशिवाय रब्बी पेरणी व बियाणांसाठी हेक्टरी १० हजारांप्रमाणे ६५२ कोटी मिळाले. पण, त्यातील चार लाख १५ हजार शेतकऱ्यांची ११०० कोटी रुपयांची भरपाई अजूनही मिळालेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.