शेतकऱ्यांना आता ऑनलाईन बुकिंगशिवाय खते नाहीतच! आधार क्रमांक, जमीन, पिकाची माहिती, खतांची पोती, दुकानदार निवडावा लागणार; टोकनद्वारे 3 दिवसांत मिळेल खत

अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) या मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन खत बुकिंगची नवी प्रणाली सुरू करण्याची तयारी केली आहे. पुणे जिल्ह्यातील अष्टापूर येथे यशस्वी पथदर्शी प्रयोगानंतर सध्या कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यानंतर सोलापूरसह राज्यभर त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
खते
खतेFile photo
Updated on

सोलापूर : अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) या मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन खत बुकिंगची नवी प्रणाली सुरू करण्याची तयारी केली आहे. पुणे जिल्ह्यातील अष्टापूर येथे यशस्वी पथदर्शी प्रयोगानंतर सध्या कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्यानंतर सोलापूरसह राज्यभर त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मात्र, या नव्या व्यवस्थेबाबत सोलापूर सीड्स फर्टिलायझर अँड पेस्टिसाईड डीलर्स असोसिएशनने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

ऑनलाइन बुकिंगमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या खतसाठ्याची माहिती मिळणार असून, आवश्यक खत थेट आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे दुकानांवरील गर्दी कमी होईल, खतांचे समन्यायी वितरण शक्य होईल आणि असंतुलित किंवा अविवेकी खतवापरावर नियंत्रण मिळविता येईल. दुसरीकडे, डीलर्स असोसिएशनच्या मते, ग्रामीण भागातील अनेक शेतकरी स्मार्टफोन, इंटरनेट किंवा डिजिटल प्रक्रियेत अद्याप पूर्णपणे पारंगत नाहीत. फार्मर आयडी, पीक नोंदणी, आधार पडताळणी आणि ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे खत वितरणात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ऑनलाइन खत बुकिंगची प्रक्रिया अशी...

  • मोबाइल ॲपवर शेतकऱ्यांची नोंदणी

  • आधार व ओटीपीद्वारे पडताळणी

  • जमीन व पीक माहिती नोंदविणे

  • आवश्यक खत व गोण्यांची संख्या निवडणे

  • जवळील विक्रेता निश्चित करणे

  • क्यूआर कोड व टोकन प्राप्त करणे

  • तीन दिवसांत खत उचलण्याची सुविधा

अनुदानित खतांसाठी करावी लागणार ऑनलाईन बुकिंग

फार्मर आयडी व पीक नोंदणीशी जोडलेल्या या प्रणालीत प्रारंभी काही अडचणी येऊ शकतात. मात्र, त्या दूर करत पुढे गेल्यास खतांचा सुरळीत व समतोल पुरवठा होईल. तसेच, असंतुलित व अविवेकी खतवापरावर नियंत्रण आणणे शक्य होईल. सध्या ऑनलाइन बुकिंगद्वारे गॅसपुरवठा सुरळीत सुरू आहे. त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना आता अनुदानित खतांचेही ऑनलाईन बुकिंग तथा मागणी करावी लागणार आहे.

- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

अडथळे दूर करुनच प्रणाली अंमलात आणावी

अनेक शेतकरी अजूनही ऑनलाइन प्रक्रियेशी पूर्णपणे परिचित नाहीत. फार्मर आयडी, पीक नोंदणी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि तांत्रिक अडचणींमुळे खत वितरणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही प्रणाली राज्यभर लागू करण्यापूर्वी शेतकरी व विक्रेत्यांना पुरेसे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष अडचणी दूर करणे आवश्यक आहे.

- बालाजी चौगुले, अध्यक्ष, सोलापूर सीड्स फर्टिलायझर अँड पेस्टिसाईड डीलर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com