कर्जमाफीच्या यादीसाठी २८ फेब्रुवारीचा मुहूर्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी २१ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होती. मात्र, यासाठी सरकारने मुदतवाढ दिली असून, ही यादी २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

मुंबई - कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी २१ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार होती. मात्र, यासाठी सरकारने मुदतवाढ दिली असून, ही यादी २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने आकस्मिकता निधीत १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय बुधवारी घेतला असला, तरी त्या निर्णयावर अद्याप राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही. येत्या एक-दोन दिवसांत त्या प्रस्तावावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यास मार्चपासून शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार सप्टेंबर २०१९ पर्यंत दोन लाख रुपयांची कर्जमाफी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी आकस्मिकता निधीत १५ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सोमवारपासून (ता. २४) सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला आहे. या योजनेचा लाभ सुमारे ३३ लाख शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. 

आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडणे आवश्‍यक 
कर्जमाफी योजनेसाठी संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडले असणे आवश्‍यक आहे. काही ठिकाणी अजूनही आधार कार्ड शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याशी जोडले गेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड मुदतीत केली आहे अशांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार अधिवेशनकाळात नवीन घोषणा करण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: February 28 deadline for the debt waiver list