फर्ग्युसन कॉलेज आता विद्यापीठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

मुंबई - पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली. नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सुरू होतील.

मुंबई - पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली. नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सुरू होतील.

शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासह जागतिकीकरणाच्या वेगाबरोबर रोजगाराभिमुख नवनवीन अभ्यासक्रम, संशोधन व विकास आणि नवोपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता देण्याचे शासनाचे धोरण आहे. या संकल्पनेचा पुढील टप्पा म्हणून स्वायत्तता दिलेल्या महाविद्यालयांना भौतिक संरचना व पायाभूत सुविधांसाठी आर्थिक साह्य देण्यात येते. राज्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना १८८४ मध्ये पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आली. गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट अशा उच्च शिक्षणाची परंपरा असणारे हे महाविद्यालय भारतातील महाविद्यालयांच्या एनआयआरएफ मानांकनात १९ व्या स्थानावर असून, महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या स्वायत्त दर्जा असणाऱ्या या महाविद्यालयाचे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानामधील (रुसा) मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यापीठात रूपांतर करण्यात येत आहे. रुसातील सूचनांनुसार स्वायत्त महाविद्यालयांची दर्जावाढ करून त्यांचे विद्यापीठात रूपांतर करण्याच्या योजनेअंतर्गत राज्यात प्रथमच खासगी अनुदानित संस्थेच्या माध्यमातून नवीन विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यानुसार विद्यापीठासाठी आवश्‍यक पदनिर्मिती आणि भरती करण्याच्या प्रक्रियेस मान्यता देण्यात आली असून, त्याचा खर्च डेक्कन एज्युकेशन सोसायटीने करण्यास आणि महाविद्यालयाची मालमत्ता विद्यापीठास हस्तांतर करण्यास मंजुरी देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fergusson college fergusson University